आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Cooperativ Bank's 5 Director Constituncy Cut Down

सोलापूर सहकारी बँकेच्या 5 संचालकांच्या मतदारसंघांवर गंडांतर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सहकार कायद्यातील 97 व्या घटनादुरुस्तीनुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याचे काम सुरू आहे. यात बँकेचे माजी अध्यक्ष रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ संचालक भाई एस. एम. पाटील, प्रतापसिंह मोहिते-पाटील आणि अरुण कापसे, सुनील सातपुते या संचालकांचे मतदारसंघ इतर मतदारसंघात विलीन होण्याची शक्यता आहे.

सहकार कायद्यातील दुरुस्तीनुसार प्रत्येक सहकारी संस्थांचे संचालक 18 असणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेचे सध्या एकूण 27 जणांचे संचालक मंडळ आहे. यामध्ये 11 तालुक्यांतील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे प्रतिनिधी (11), जिल्ह्यातील बँकेस संलग्न मार्केटिंग सोसायटी (1), सहकारी साखर कारखाने, शेतीमाल प्रक्रिया संस्था (1), नागरी सहकारी बँका, पतसंस्था, पगारदार नोकर संस्था (1), दुग्धव्यवसाय सहकारी संस्था (1), ग्राहक पाणीपुरवठा संस्था (1), व्यक्तिगत भागीदार (1), अनुसूचित जाती जमाती (1), इतर मागास (1), विमुक्त भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग (1), अर्थिक दुर्बल घटक (1), महिला प्रतिनिधी (2), सेवक प्रतिनिधी (3), महाराष्ट्र शासन प्रतिनिधी (1) यांचा समावेश आहे. यापैकी आता विकास सेवा सोसायटीचे मतदारसंघ अबाधित राहतील. उर्वरित 7 मतदारसंघांच्या बदलांचे निकष कायद्याने ठरवून दिले आहेत.

नव्या कायद्यानुसार आता सोसायटी मतदार संघ (11 संचालक), पणन, प्रक्रिया, कारखाने, औद्यागिक संस्थांमधील प्रतिनिधी (1), महिला (2), ओबीसी (1), अनुसूचित जाती जमाती व विमुक्त भटक्या जमाती (1), दूध संस्था, कुक्कुटपालन, पाणीपुरवठा, शेळी-मेंढीपालन संस्था (1), ग्राहक गृहनिर्माण, औद्योगिक प्रक्रिया, औद्योगिक मजूर संस्था, व्यक्तिगत सभासद (1) असे एकूण 18 संचालक निश्चित केले आहेत. त्यानुसार बँकेने रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा जिल्ह्यातील बँकेस संलग्न सोसायटी, प्रतापसिंह मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाने शेतीमाल प्रक्रिया संस्था हे मतदारसंघ रद्द होऊन त्यांचा पणन, शेतीमाल प्रक्रिया, औद्योगिक संस्थामधील प्रतिनिधी या मतदारसंघात समावेश होईल. भाई एस. एम. पाटील यांचा व्यक्तिगत भागीदार, अरुण कापसे यांचा ग्राहक पाणीपुरवठा संस्था हा मतदारसंघ दूध संस्था आणि औद्योगिक प्रक्रिया व मजूर संस्था यामध्ये विलीन होत आहे. सुनील सातपुते यांचा अर्थिक दुर्बल घटक प्रतिनिधी आदी मतदारसंघ रद्द झाला आहे.

हा बदल कायद्यानुसार झालेला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने यासंदर्भात विश्वासात न घेतल्यामुळे आक्षेप नोंदवणार असल्याचे सहकारी साखर कारखाना शेतीमाल प्रतिनिधी संस्थेचे संचालक प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
आक्षेप नोंदवणार
जिल्हा बँकेत आता आमच्या विरोधकांचे बहुमत आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेतबाबत आपणाला माहिती मिळाली आहे. यासंदर्भात आगामी काळात होणार्‍या बैठकांमध्ये आक्षेप नोंदवणार आहे. प्रतापसिंह मोहिते-पाटील, संचालक, जिल्हा बँक