आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचालकांनी गंडवले, अवसायकांनी लुटले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- संचालकांनी केलेल्या गैरव्यवहारांमुळे शहरातील सात बँका अवसायनात (लिक्विडेशन) निघाल्या. अक्कलकोटची स्वामी सर्मथ सहकारी बँक सहा महिन्यांपूर्वी विसर्जनात काढण्यात आली. अशा एकूण आठ बँकांवर सहकार खात्याने अवसायक समिती नियुक्त केली आहे. थकीत कर्जाची वसुली करणे, ठेवीदारांच्या रकमा परत करणे, दोषी संचालकांवर कारवाई करणे, स्थावर आणि जंगम मालमत्तेची विल्हेवाट लावणे ही समितीची कामे आहेत. प्राधान्यक्रमानुसार रिझर्व्ह बँकेच्या डिपॉझीट इन्शुरन्स अँण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पाेरेशनकडे लाखाच्या आतील विमापात्र रकमांचे दावे दाखल करणे. आलेल्या रकमांचे वाटप करणे हे काम होते. त्यासोबतच कर्जवसुलीचे काम असते; परंतु ते वेगळ्याच पद्धतीने चालते.

कर्ज 15 लाख, भरले 2 लाख

विसजिर्त सोलापूर जिल्हा महिला बँकेतील हा धक्कादायक प्रकार. बँक विसर्जनात निघाल्यानंतर तब्बल 12 वर्षांनी एक कर्जदार पैसे भरण्यासाठी आला. त्याची रक्कम 15 लाख 79 हजार 146 रुपये इतकी होती. मुद्दल पाच लाख 39 हजार 536 असून त्यावरील थकीत व्याज नऊ लाख 64 हजार 413 आहे. पाच टक्के रक्कम अवसायन प्रक्रिया शुल्क अशी मिळून एकूण रक्कम पावणेसोळा लाखांच्या वर जाते. त्यावर अवसायकाने तडजोड केल्यानंतर तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी 6 एप्रिल 2011 रोजी लेखी पत्र देऊन फक्त दोन लाख 28 हजार रुपये भरून घेतले. या बँकेत अशी अनेक प्रकरणे आहेत. विसजिर्त सोलापूर र्मचंट बँक, उद्योग बँकेतही असेच प्रकार झाले. त्यासाठी ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होत असल्याचे कर्जदारांनीच सांगितले.

कायदा काय म्हणतो?

सहकारी संस्था समाप्तीकरण अधिनियमाने कलम 105 ते 110 पर्यंतचे अधिकार अवसायकांना आहेत. त्यानुसार कर्जवसुलीत केवळ व्याजात सवलत देता येते. तेही 50 टक्क्यांच्या वर असेल तर वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी आवश्यक असते.

सहकाराच्या जुन्या कायद्याप्रमाणे कुठल्याही विसर्जन 10 वर्षांच्या आत करणे आवश्यक आहे. मुदतवाढीसाठी पुरेशी कारणे द्यावी लागतात. ते अनिवार्य असेल तरच मुदत मिळते. परंतु सोलापुरात 14 वर्षांपासून अवसायन प्रक्रिया सुरूच आहे.

ताज्या 94 व्या घटनादुरुस्तीनुसार सहकार कायद्यात दुरुस्ती झाली आहे. संस्थेचे विसर्जन दोन वर्षांत पूर्ण करणे अनिवार्य आहे. दरम्यान दोषींवर खटले दाखल करण्यासह इतर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहेत.