आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर काँग्रेसची मनपा निवडणूक तयारी सुरू, सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्या कार्यकर्त्यांना ‘टीप्स’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - येणाऱ्या महापालिका निवडणुका पुन्हा जिंकण्यासाठी प्रत्येक वॉर्डात १०० ते २०० कार्यकर्ते तैनात केले पाहिजेत. तसेच विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या एमआयएमसह भाजप, सेना या पक्षांबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जागरूक असले पाहिजे, आतापासूनच तयारीला लागले पाहिजे, असे आवाहन करीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना वेगवेगळया टीप्स दिल्या.

शहर काँग्रेस कमिटीतर्फे आयोजिलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिंदे बोलत होते. शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार अध्यक्षस्थानी होते. या वेळी महापौर सुशीला आबुटे, आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार धर्मण्णा सादूल, प्रदेश सचिव धर्मा भोसले, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पाटील, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष प्रा. ज्योती वाघमारे, अलका राठोड, सभागृह नेता संजय हेमगड्डी, परिवहन सभापती सलीम सय्यद आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार जात धर्मामध्ये तेढ निर्माण करीत आहे. भाजपच्या केंद्रातील मंत्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर घाणेरड्या शब्दांत टीका करतात. त्याचा निषेध झाला पाहिजे, असे ते म्हणाले

कामगार, उद्योग सुविधांपासून वंचित

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणताही अर्थ नव्हता. काँग्रेस यूपीए सरकारने राबवलेल्या चांगल्या योजना बंद करून गरिबांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे. सोलापुरातील कामगार, यंत्रमाग हातमाग उद्योगांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. राज्याचे कामगार मंत्री सोलापूरचे असून ते नुसत्या बैठकाच घेतात, अशी टीका केली.

जातीयवादी पक्ष फोफावतोय

जातीयवादी पक्ष फोफावतोय, अशा पक्षांना रोखण्यासाठी अंतर्गत मतभेद बाजूला करून महापालिका निवडणुकांसाठी प्रत्येक वॉर्डामध्ये कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण करा, असे आवाहन शिंदे यांनी केले. महापालिकेची स्थिती चांगली नसल्याने महापौरांनी क्रीडा स्पर्धा स्थगित करून शहराच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी महापौर आबुटे यांचे अभिनंदन केले.

काँग्रेस भवन येथील बैठकीत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेसचे धर्मा भोसले, सुधीर खरटमल, प्रकाश यलगुलवार, धर्मण्णा सादूल, निर्मला ठोकळ, उज्ज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, ज्योती वाघमारे आदी उपस्थित होते.