आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद शाळा इमारती वाऱ्यावर, काहींची दारे, खिडक्या आणि फरशा गायब, इमारतींचा गैरवापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या नऊ शाळा अनेक वर्षांपासून बंद आहेत. याच्या इमारतीकडे प्रशासनाचे लक्ष नाही. त्यामुळे दारे, खिडक्या आणि फरशा चोरीला गेल्या आहेत. काही ठिकाणी गैरवापर होत आहे.

सध्या महापालिकेच्या ६३ शाळा सुरू आहेत. खासगी शाळांचे वाढते प्रमाण आणि त्याकडे आकर्षिला जाणारा पालकवर्ग यामुळे महापालिकेच्या शाळा ओस होत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने रिक्त झालेले शिक्षक पदे भरली जात नाहीत. यामुळे एका इमारतीत दोन-दोन शाळांचे वर्ग होत आहेत.
विद्यार्थीही नाही आणि शिक्षकही नाही. यामुळे शाळा बंद पडू लागल्या. ही स्थिती गेल्या दहा-बारा वर्षांपासून सुरू आहे. याची दखल शिक्षण मंडळ आणि महापालिकेने योग्य पद्धतीने घेतली नाही. त्यामुळे शाळा इमारतीची अवस्था दयनीय झाली आहे.

इमारतींची दयनीय अवस्था
तुळजापूर वेस येथील मराठी शाळेच्या इमारतींचे दारे, खिडक्या आणि फरशी सर्व चोरीला गेले आहेत. सध्या याचा शौचविधीसाठी वापर होत आहे. जुना एम्प्लाॅयमेंट चौक येथील मोची समाज वस्तीतील शाळा दहा ते बारा वर्षापासून बंद आहे. या इमारतीचीही अशीच अवस्था झाली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील शाळेची दयनीय आहे. सरस्वती चौकातील शाळाही बंद आहे.

इमारतींचा होतोय गैरवापर

मंगळवार बाजार येथील आणि ढोर गल्लीत मराठी शाळांच्या दोन मजली इमारती आहेत. मंगळवार बाजार येथील शाळेच्या आवारातील सर्व फरशा चोरीला गेल्या आहेत. परिसरातील असलेले काही मिनी गाळेधारक शाळेच्या आवाराचा वापर करत आहेत. शाळेतील नळाचा मिनी गाळेधारक वापर करत आहेत. ढोर गल्लीमधील शाळेच्या सर्व दहा खोल्या खुल्या आहेत. येथील फूल व्यापारी आणि लहान लहान व्यापारी या खोल्यांचा व्यवसायासाठी वापर करत आहेत.
किडवाई चौक येथील उर्दू मुलींची शाळा ही पूर्णपणे बंद असून याचा लग्न कार्यासाठी वापर केला जात आहे.

काही इमारतीची स्थिती चांगली आहे. खोल्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, याचा सदुपयोग पालिका प्रशासनाकडून केला जात नाहीत.

फरशा गायब : मंगळवारबाजार परिसरातील महापालिकेच्या मराठी शाळेच्या मागील पटांगणातील फरशा चोरण्यात येत आहेत.

चांगली इमारत : तुळजापूर वेस चौक परिसरातील महापालिकेच्या मराठी शाळेची इमारत सुसज्ज असून दारे, खिडक्या आणि फरशा चोरीला जात आहेत.

चांगली इमारत : मंगळवारबाजार परिसरातील महापालिकेची मराठी शाळा सुसज्ज असून दहा खोल्या आहेत. याचा येथील गाळेधारक गैरवापर करत आहेत.

मोडकळीस : कोनापुरे चाळ येथील महापालिकेच्या मराठी शाळेच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. दारे, खिडक्या आणि कौलरू सुध्दा चोरीला गेले आहेत.
पालिकेस कळवले आहे

जीर्ण इमारती आणि सुसज्ज इमारती याविषयी महापालिकेला पत्राद्वारे कळवले आहे. महापालिकेने याबाबत निर्णय घ्यावा.” विष्णूकांबळे, प्रशासन अधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ

इमारतीचा वापर आणि विकास असा होऊ शकतो

शाळाबंद असलेल्या पण इमारती चांगल्या स्थितीत आहेत तेथे स्पर्धा परीक्षा, संगणक प्रशिक्षण केंद्र, खासगी क्लासेस आदींना भाडेतत्त्वावर देता येईल. ज्या ठिकाणी इमारती जीर्ण आहेत त्या पाडून तेथे महापालिकेच्या अखत्यारीतील मंगल कार्यालय, मॉल बांधता येईल. जेणेकरून नागरिकांना सुविधा होतील आणि महापालिकेला उत्पन्नही होईल.