आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिअर शॉपीत तरुणांचा धुडगूस; सोन्याची बाळी, साखळी, रक्कम पळवल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अक्कलकोट रस्ता मल्लिकार्जुन नगरातील रवी बिअर शॉपीत सहा तरुणांनी धुडगूस घालून सचिन महादेव कटके यांना मारहाण करून कानातील सोन्याची बाळी, दीड तोळ्याचे लॉकेट व दोन हजार रुपये घेऊन गेले. या प्रकरणी चौघांना शनिवारी अटक झाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमाराला घडली.
कटके यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सिराज जकलेर (रा. संगमेश्वरनगर), दाऊद कादर कबाडी, बाबूलाल कोलार (रा. दोघे तेलंगी पाच्छापेठ), वाईद जाहागीरदार (रा. शनिवारपेठ) यांना अटक झाली असून, न्यायाधीश डी. बी. हंबिरे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर 21 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. सरकारतर्फे एन. एम. नाईकवाडी यांनी तर आरोपीतर्फे माणिकचंद राठोड यांनी काम पाहिले.
जकलेर व त्याचे साथीदार बिअर शॉपीत आले. चार बिअर घेऊन दोन बिअरचेच पैसे दिले. त्यावेळी कटके यांनी आणखी पैशाची मागणी केल्यानंतर शिवीगाळी करून दुकनातील सर्वांना मारहाण केली. पैसे, दागिने घेऊन पळून गेले. साहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश वेळापुरे तपास करीत आहेत.
मारहाण करून पैसे पळवले
कामगारांना मारहाण करताना मलिक नागनाथ धोत्रे (रा. मड्डीवस्ती) यांनी मध्यस्थी केल्यामुळे त्यांना मारहाण करून 25 हजार रुपये पळवले. ही घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमाराला घडली. त्यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. दीपक साळुंखे, र्शीकांत दोरकर, बबन माने (रा. सर्वजण जोशी गल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मार्केड यार्डाजवळ तिघेजण काहीजणांना मारहाण करीत होते. ते भांडण धोत्रे यांचे कामगार सोडवत होते. तिघांनी मिळून कामगारांनाच मारहाण करू लागले. त्यावेळी धोत्रे मध्यस्थी करताना त्यांना मारहाण करून पैसे पळवले आहेत. धोत्रे हे गवंडी काम करतात. सोडा बाटलीने मारहाण झाली असून, त्यात अर्जुन धोत्रे, बसलिंग किरसावळगी, देवेंद्र किरसावळगी, मलिक हे जखमी झाले आहेत. साहाय्यक निरीक्षक भुसनूर तपास करीत आहेत.
शाळकरी मुलीचा विनयभंग
शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमनाथ तानाजी कोथिंबरे (वय 19, रा. गणेशनगर, मडकीवस्ती) याला अटक झाली आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. पीडित मुलगी खासगी क्लासमधून घराकडे येताना हा प्रकार घडला. महिला फौजदार शेख तपास करीत आहेत.
अपघातात महिलेचा मृत्यू; दीड वर्षाची मुलगी जखमी
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावाजवळ ट्रॅक्टरची (एमएच 13 जे 6949) धडक बसून एका महिलेचा मृत्यू झाला. संगीता राजेंद्र भोगडे (वय 20, रा. सिंदखेड, ता. दक्षिण सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांची मुलगी मंगला भोगडे (वय दीड वर्षे) ही जखमी झाली आहे. शनिवारी सकाळी त्या पायी पाथरी गावाजवळील गरड यांच्या शेताजवळून जाताना ट्रॅक्टरची धडक बसली. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर संगीता यांचा मृत्यू झाला. मुलीवर उपचार सुरू आहेत.
बैलगाडीतून पडल्याने तरुणाचा मृत्यू
बैलगाडीतून जाताना पडल्यामुळे नागनाथ ज्ञानोबा देवकर (वय 37, रा. पुळूजवाडी, पंढरपूर) या तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी हा अपघात गावाजवळ घडला होता. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.
जखमी महिलेचा मृत्यू
बोरामणीजवळ जखमी अवस्थेत सापडलेल्या अन्नपूर्णा अंबादास बुर्ला (वय 40, रा. जवाहरनगर, विडी घरकुल) या महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. 11 नोव्हेंबर रोजी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.