आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासाचे आव्हान कायम, पोलिस दहिटणे शिवारात धागेदोर्‍यांच्या शोधात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दहिटणे परिसरात सोमवारी तीन अज्ञात मुलांचे मृतदेह सापडले होते. त्या मृतदेहांची ओळख अद्याप लागलेली नाही. मंगळवारी त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह मिळाल्याच्या अफवेने पोलिसांचे धाबे दणाणले.

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक अफवा उठली की दहिटणे शिवारात आणखी एक मृतदेह सापडला आहे. कोणी म्हणत होते की तो महिलेचा आहे, तर कोणी म्हणाले की तो पुरुषाचा आणि तोही धडावेगळा. घटनास्थळी तडक धाव घेतलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सदरहू शिवारात काहीही आढळले नाही. पोलिसांनी पुन्हा एकदा मृतदेह सापडले होते ती शेते पुन्हा धुंडाळली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत हे शोधकार्य सुरू होते.

पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक नितीन कौसडीकर, डिव्हीजन वनचे र्शी. किवटे, पोलिस निरीक्षक वाय. बी. शिर्के, हवालदार राजेंद्र कांबळे, दीपक राऊत, गजानन कणगिरी यांची उपस्थिती होती.

यांनी दिली आहे फिर्याद
पंचय्या शिवलिंगय्या मठपती (वय 50, रा. शेत गट क्रमांक 8/2, 8/3, दहिटणे गाव) यांनी या घटनेसंदर्भात जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी घातक शस्त्राने वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले, असा या फिर्यादीत उल्लेख आहे.

हे आवर्जून करा
घरातील कोणीही व्यक्ती जर हरवली किंवा घरातून निघून गेले असतील तर त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधून छायाचित्राची एक प्रत द्यावी. व्यक्ती सापडली तरी पुन्हा पोलिस ठाण्याला सूचित करावे.

सात पथके रवाना
हे मृतदेह जेव्हा सापडले, त्यापूर्वी किमान दोन दिवसांपूर्वी हे खून झाले असावेत. तपासासाठी सात पथके तैनात केली असून कर्नाटक, आंध्र तसेच जिल्ह्यात आणि शेजारील जिल्ह्यात पथके तपासासाठी गेली आहेत. वाय. बी. शिर्के, तपास अधिकारी

असा सुरू आहे तपास
मंगळवारी घटनास्थळी दाखल झाल्यावर पोलिसांनी हाती काहीही लागले नाही म्हणून आजूबाजूच्या रहिवाशांची कसून चौकशी केली. तसेच ज्या शिवारात मृतदेह सापडले तिथंपर्यंत एका चारचाकी वाहनाच्या टायरचे ठसे उमटलेले आहेत. ती गाडी कोणाची? कधी आली? किती वेळा आली? किती वाजता आली? याचा तपास केला. तसेच गाडीपासून मृतदेहाचे अंतर मोजले.

पुढे काय?
हे तीनही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले व तेथे कागद, चिठ्ठी किंवा तसा कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याने पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे आहे. पोलिसांच्या मते हे खून संपत्तीच्या वाटणीवरून अथवा अनैतिक संबंधातून झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मृतांच्या शरीरावरील कपडे व त्यावरील टेलरचे नाव हा एक पुरावा ठरू शकतो.

तपासकाम सुरू आहे
सकाळी दहिटणे शिवारात चौथा मृतदेह सापडला, ही केवळ अफवाच होती. तरीही खात्री करण्यासाठी तेथे गेलो होतो. पुढील तपासासाठी गुन्हे शाखेची चार पथके गेलेली आहेत. तपासकाम सुरू आहे. पी. आर. पाटील, पोलिस उपायुक्त

जानेवारी 2013 पासून जून 2013 या सहा महिन्यांत शहरातून 51 मुले हरवली होती, त्यातील 49 सापडली तर अजून दोनजण बेपत्ता आहेत. तर 99 मुली हरवल्या होत्या व त्यापैकी 94 मिळालेल्या असून पाच मुलींचा अजून शोध लागलेला नाही. (शहरातील मुख्य सात पोलिस ठाण्यात झालेल्या नोंदीवरून ही आकडेवारी मिळवलेली आहे.)