आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार तालुके टंचाईसदृश जाहीर; बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस यांचा अंतर्भाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - राज्य सरकारने कमी पाऊस झालेल्या तालुक्यांचा टंचाईसदृश म्हणून जाहीर केले आहेत. राज्यात 123 तालुके टंचाईसदृश म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यात जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट व माळशिरस या चार तालुक्यांचा समावेश आहे.
यंदा राज्यात अपवादवगळता सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत. त्यामुळे राज्याच्या अनेक तालुक्यात टंचाई स्थिती आहे. तसेच मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने टंचाईसदृश स्थिती जाहीर करण्याची मागणी मराठवाड्यातील मंत्र्यांनी लावून धरली़ त्यावर पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री सोपल यांनी टंचाईसदृश स्थितीसाठी जिल्हा हा निकष न लावता तालुका हा निकष लावण्याची मागणी केली. त्यानुसार सरासरीच्या 50 टक्केपेक्षा कमी पाऊस झालेले तालुके टंचाईसदृश म्हणून घोषित करण्यात आले.

या सवलती मिळणार
राज्य शासनाच्या या निर्णयानुसार शेतीपंपांच्या वीजबिलांमध्ये 33 टक्के सवलत, शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी आणि शेतकर्‍यांना सारा माफी या सवलती मिळणार असल्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी सांगितले.

एप्रिलपासून होत आहे अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, चार्‍याचा प्रश्नही बनलाय गंभीर
मंगळवेढा -
राज्य शासनाने 50 टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुके टंचाईसदृश म्हणून जाहीर केले. मात्र, कायम दुष्काळी आणि यंदा त्यापेक्षा कमी पाऊस पडला असतानाही मंगळवेढा तालुक्याला यातून वगळण्यात आल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांत अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने मंगळवेढा तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. आतापर्यंत तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. एप्रिलपासून सुरू झालेला टँकरद्वारे पाणीपुरवठा आता पावसाळ्यातही सुरूच आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टँकर मंगळवेढा तालुक्यात सुरू आहेत. त्यामुळे शासनाने कोणत्या निकषाच्या आधारे टंचाईसदृश तालुक्यातून मंगळवेढ्याला वगळले, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
पावसाअभावी तालुक्यात जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी व पशुपालकांकडून शासनाने चारा पुरवावा, अशी मागणी होत आहे. मागील दोन वर्षांतील दुष्काळ आणि यंदाच्या वादळी वारा, गारपिटीसह झालेला पाऊस यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. तर यंदा पावसाअभावी विहिरी, कूपनलिका, पाझर तलाव कोरडे आहेत. शेतकरीच अडचणीत आल्याने शेतीच्या कामांअभावी मजुरांना रोजगार नाही. अशा स्थितीत शासनाच्या विचित्र निर्णयामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
अद्याप आदेश निघाला नाही
टंचाईसदृशचा शासन आदेश अद्याप निघाला नाही. त्यामुळे त्यात कोणता तालुका आहे अथवा नाही याची ठोस माहिती नाही. तरीही मंत्रालयातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू.’’
श्रावण क्षीरसागर, प्रांताधिकारी, मंगळवेढा

जिल्ह्यात मंगळवेढ्यात सर्वाधिक दुष्काळी स्थिती आहे. तरीही तालुक्याला टंचाईसदृशमधून वगळणे अन्यायकारक आहे. लोकप्रतिनिधी व नेत्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तालुक्यातील स्थिती त्यांच्या नजरेस आणावी आणि तालुक्याचा त्यात समावेश करावा.’’
शिवानंद पाटील, सभापती, जिल्हा परिषद

तालुक्याचा टंचाईसदृशमध्ये समावेश न झाल्याने शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. वारंवार तालुक्यावर अन्याय होत आहे. तालुक्याला कोणी वाली नाही, अशीच स्थिती आहे.’’
विजयसिंह पाटील, शेतकरी, ब्रह्मपुरी
वर्षांपूर्वीही असेच झाले होते
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन तहसीलदार व तालुका कृषी अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेही तालुक्याचा दुष्काळग्रस्तमध्ये समावेश झाला नव्हता. याविरोधात तालुक्यातील लोकांनी आंदोलन केल्यानंतर त्यात समावेश झाला होता.