आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा नियोजन समिती निवडणूक; अंतिम यादी आज लागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीची अंतिम यादी सोमवारी प्रसिद्ध होणार आहे. समितीच्या 40 जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी निवडून जाणार आहेत. दरम्यान, अर्ज रद्द झाल्याच्या माहितीविषयी विचारले असता, अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच निर्णय घेऊ, असे महापौर अलका राठोड व माजी महापौर आरिफ शेख यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

समितीच्या महापालिका गटातून त्यांनी केलेले अर्ज रद्द झाल्याची माहिती आहे. मात्र, ते अधिकृतरीत्या सोमवारी स्पष्ट होणार आहे.

सौ. राठोड, र्शी. शेख व माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे या तीनही काँग्रेस उमेदवारांनी राखीव जागेतून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज केला होता. तीनही उमेदवार महापालिकेत खुल्या वर्गातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत राखीव जागेसाठी अर्ज करता येणार नाही, अशी हरकत विरोधकांनी घेतली होती. त्यावरील अंतिम सुनावणीत जिल्हाधिकारी डॉ. प्रवीम गेडाम यांनी तीनही उमेदवारांच्या विरोधात निकाल दिला. त्यामुळे तीनही उमेदवार अडचणीत आले आहेत. तत्पूर्वी विरोधकांची हरकत निवडणूक निर्णय अधिकारी अशोक काकडे यांनी फेटाळून लावली होती. त्यामुळे विरोधकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागितली होती. समितीत महापालिका गटासाठी 9 जागा आहेत.

‘आम्ही अपील केले नाही’
जिल्हाधिकार्‍यांच्या निकालाविरोधात तीनही उमेदवारांना उच्च् न्यायालयाचा पर्याय आहे. त्यासंदर्भात विचारले असता, तूर्त तरी आम्ही उच्च न्यायालयात अपील केले नाही, असे महापौर अलका राठोड व माजी महापौर अरिफ शेख यांनी स्पष्ट केले. सोमवारी अंतिम यादी लागल्यावर अपिलाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती महेश कोठे यांनी दिली.

डीपीसीच्या 40 जागा
‘डीपीसी’च्या 40 जागांपैकी नऊ महापालिका, जिल्हा परिषदेच्या 27, नगरपरिषदेच्या 4 जागा आहेत. 5 तारखेस अर्ज मागे घेता येईल. 14 तारखेस मतदान व 16 तारखेस मतमोजणी होईल.