आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‍सोलापुर ‍जिल्हा बॅंकेची उद्या सभा; दोनशेच्या सभागृहात कसे मावणार 22000 सदस्य?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 14) बँकेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचारी प्रशिक्षण दालनात आयोजित केली आहे. सक्रिय सभासद होण्यासाठी सभासद मोठय़ा संख्येने सभेला हजेरी लावतील. परंतु बँकेचे सुमारे 22 हजार सभासद 200 आसनांच्या प्रशिक्षण दालनात कसे बसतील, हा प्रश्न आहे.
जिल्हाभरातील सभासद यावेत यासाठी दुपारी एकची वेळ निवडली खरी; परंतु प्रशिक्षण दालनात बँकेचे सारेच सभासद बसतील, असे नाही. सहकार कायद्यातील दुरुस्तीनुसार आता सर्वच सभासदांना सक्रिय (अँक्टिव्ह मेंबर) व्हावे लागेल. त्यासाठी सभांना हजेरी लावावी लागेल. या दुरुस्त्या लागू झाल्या. पण बँकेने त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. 15 फेब्रुवारी 2013 पासून कायद्यातील दुरुस्त्या लागू झाल्या. मार्चमध्ये बँकांनी विशेष सभा घेऊन सभासदांना त्याची माहिती दिली. उपविधीत (बाय-लॉज) सुधारणा केली.
कायद्याच्या अंगाने राज्यभरातच या घटना झाल्या. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील राजकीय घटनांनी तर बँकिंग क्षेत्रातच खळबळ उडाली होती. माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचा राजीनामा, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आणि त्यावरील निकाल. या घटनांनी बँकेला हलवून सोडले होते. त्यानंतर काही सुधारणा घडवून आणल्याने बँकेची स्थिती सावरली. या घटनांचे पडसाद वार्षिक सभेत उमटणारच आहेत. संचालक मंडळाला त्याची उत्तरे द्यावीच लागतील.

येतील तसे बसवू
वार्षिक सभांना सर्वच सभासद येणे अपेक्षितच आहे. परंतु पुरेसा वेळ देऊनही बहुतांश सभासद येतच नाहीत. त्यामुळे बँकेतीलच दालन निवडले. जादा सभासद आलेच, तर त्यांचीही सोय करू.
- के. व्ही. मोटे, सरव्यवस्थापक, डीसीसी बँक

निर्णय संचालकांच्या हाती
सहकार कायद्यात सक्रिय सभासदाची व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार सभांना उपस्थिती, संस्थेतील प्रत्यक्ष सहभाग या बाबी आल्या; परंतु या दुरुस्त्या राज्य शासनाच्या पटलावर आल्यानंतर त्यात आणखी काही सुधारणा झाल्या आहेत. पूर्वपरवानगीने गैरहजर राहणार्‍या सभासदांबाबतचा निर्णय संचालकांनाच घ्यायला सांगितले आहे. सभेच्या अजेंड्यावर हा विषय घेऊन त्यावर निर्णय घेता येईल. परंतु उपस्थित राहूनही गैरसोय झाल्याची तक्रार सभासदांनी केली तर मात्र याबाबतचा खुलासा मागू शकतो.
- बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था