आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या दाखल्यासाठी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे स्वत: सोलापूर महापालिकेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुलीचा जन्म दाखला घेण्यासाठी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे बुधवारी सकाळी महापालिकेत आले. दाखला घेण्यासाठी जिल्हाधिकारी आल्याचे पाहून कर्मचार्‍यांची धांदल उडाली.

आरोग्य अधिकार्‍यांच्या कक्षात जाऊन त्यांनी दाखला घेतला. छोटा-मोठा अधिकारी असला तरी आजकाल त्याच्या दिमतीला कर्मचारी तैनात असतात, मग जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्यातील प्रमुख पद. असे असतानाही जिल्हाधिकारी मवारे आपल्या कामासाठी मनपात आल्यामुळे अनेकांना धक्का बसला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांचे शासकीय वाहन महापालिकेच्या आवारात आले.

महापालिका आयुक्तांच्या कक्षजवळ गेल्यानंतर आयुक्त अजय सावरीकर रजेवर असल्याचे जिल्हाधिकार्‍यांना सांगण्यात आले. त्यानंतर पाठीमागील प्रशासकीय इमारतीकडे ते गेले. तेथून महापालिका आरोग्य अधिकार्‍यांच्या कक्षकडे गेले. जिल्हाधिकार्‍यांना पाहून उपस्थित मोजक्या कर्मचार्‍यांची धांदल उडाली.

जिल्हाधिकारी आल्याची माहिती कर्मचार्‍यांनी आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके यांना मोबाइलवरून दिली. त्यानंतर त्या कार्यालयात आल्या. जिल्हाधिकारी मवारे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. आडके यांच्या कक्षात बसून आपल्या मुलीचा जन्म दाखला घेतला. नंतर ते निघून गेले. जन्म दाखला आपल्या कार्यालयात पाठवून दिला जाईल, असे डॉ. जयंती आडके यांनी जिल्हाधिकारी मवारे यांना कळविले होते. तरीही जिल्हाधिकारी स्वत: महापालिकेत आले. मुलीचा जन्म दाखला घेण्यासाठी जिल्हाधिकारी नव्हे तर वडील म्हणून महापालिकेत आलो, असे मवारे यांनी सांगितले. मुलीचा जन्म दाखला काढण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी महापालिकेत आल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य नक्कीच वाटले असेल, पण मवारे यांचे राहणीमान नेहमीच साधे असते. धुळ्याचे जिल्हाधिकारी असताना ते एसटी बसने प्रवास करायचे. साध्या राहणीमानमुळे ते सामान्यांनाही आपलेसे वाटतात. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांना भेटायची वेळ पूर्वी संध्याकाळी होती. मवारे हे सकाळीही नागरिकांना भेटतात.

वडिलांचे कर्तव्य
कर्मचार्‍यांची उडाली धांदल, जिल्हाधिकारी म्हणून नव्हे तर वडील म्हणून आल्याचे मवारे यांनी सांगितले, आरोग्य अधिकार्‍यांच्या कक्षात होते बसून