आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थिती पाहता ‘दिव्य मराठी’च्या वतीने पाणीबचत आणि टिळा रंगपंचमी या विषयावर ‘टॉक शो’चे आयोजन करण्यात आले होते. यात विविध समाजातील मान्यवरांनी ‘दिव्य मराठी’च्या उपक्रमाचे स्वागत करीत कोरडे रंग खेळणे व प्रसंगी रंगच न खेळण्याचा संकल्प केला.
युवकांचा चटकन प्रतिसाद
लोधी समाज बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माणिकसिंग मैनावाले यांनी ‘दिव्य मराठी’च्या उपक्रमाचे कौतुक केले. समाजातील युवकवर्गही याबद्दल जागरुक असून एका क्षणात रंग न खेळण्याचा निर्णय मान्य केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. युवकांचे आभार मानले. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.
टिळा होळीचा उपक्रम
जैन सोशल ग्रुपच्या नीता शहा म्हणाल्या, की यंदा पाण्याची गरज पाहता, आम्ही पाणी बचत करण्याचा प्रयत्न करत आहोत. होळीनिमित्त जैन सोशल ग्रुपचा स्नेहमेळावा झाला. त्यात आम्ही टिळा होळी खेळलो. विशेषत: युवकांची साथ मिळाली. पाणी बचतीचा संदेश देणे महत्त्वाचा आहे. जैन समाजात पूर्वी होळी खेळताना पाण्याचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जात असे.
रंग न खेळण्याचा निर्णय
फोर व्हीलर डीलर संघटनेचे मोहन लोढा यांनी पाण्याची समस्या ही कायम असल्याचे सांगितले. संस्थेच्या 117 सदस्यांनी रंग न खेळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. कायम जनजागृतीचे उपक्रम राबवावेत, असा संदेश दिला.
जलपुनर्भरण व्हावे
जैन सोशल ग्रुपचे खजिनदार ललित वेद म्हणाले की, आगामी काळात पाण्याची निकड भासणार आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वारंवार खालावत चालली आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी सोसायटी आणि घरावर जलपुनर्भरण प्रकल्प बसवणे गरजेचे झाले आहे. होळी आणि रंगपंचमी सण उत्साहाने पार पाडतो, पाण्याची परिस्थिती पाहता ते साजरा करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होणे आवश्यक आहे. पाण्याचा वापर कमी ठेवा आणि पाणी बचतीचा संदेश ठेवा.
टंचाईची समस्या टळेल
वीरशैव युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद मुस्तारे यांनी पाण्याचे महत्त्व शेतकर्यांपेक्षा जास्त कोणी जाणू शकत नाही, असे सांगितले. आज रंगपंचमीला पाणी वाचवले तर पुढील दोन महिन्यांची समस्या टळेल. टिळा पंचमीने पाण्याचा अपव्यय टळेल. स्वत: 5 हजार प्रबोधनपर एसएमएस पाठविणार असल्याचे सांगितले.
.. रंग खेळणार नाही
जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष उन्मेश कर्नावत म्हणाले, की पाण्याची टंचाई पाहता, आम्ही जैन सोशल ग्रुपच्या वतीने टिळा होळी खेळलो. 150 जोडपे आणि 70 युवकांनी टिळा होळीस प्रतिसाद दिला. रंगपंचमी दिवशी चाटी गल्लीतील आमचा ग्रुप रंग खेळणार नाही, पण गेट टुगेदर, स्नेहभोजन सारखे कार्यक्रम करण्यास हरकत नाही. इतर कार्यक्रमाने हा उत्साह साजरा केला जातो. टिळा होळी खेळण्यासाठी तोंडी प्रचार करणे आवश्यक आहे.
सहभाग घेतलेले मान्यवर
या वेळी हनुमानसिंग चौघरी, रामसिंग अंबेवाले, परशुराम सतारवाले, मोहनसिंग हजारीवाले, रामसिंग धनीवाले, सीताराम बाडीवाले, आनंद मुस्तारे, उन्मेश कर्नावट, ललित वैद, नीता शहा, मोहन लोढा, इस्माईल शेख, उज्ज्वल दीक्षित, संजयसिंह चौहान, प्रतापसिंह चौहान, विजयसिंह चौहान उपस्थित होते.
मनस्वी आनंद झाला
सुमारे 250 वर्षांची परंपरा असणार्या राजपूत समाजाच्या रंगगाड्या यावर्षी निघाल्या नाहीत. पूर्वी आमची मिरवणूक यायची म्हटल्यावर मार्गावरील दुकाने बंद असायची. यंदा रंगच नसल्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक केले. नागरिकांनीही पाणी या विषयास गांभीर्याने घेऊन सुक्या रंगांचा वापर करीत उत्सव साजरा करावा.’’ उज्ज्वल दीक्षित, राजपूत समाज
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.