आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण काढताना मनपाचे अधिकारी, पोलिसांना मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सलगरवस्ती येथील सेटलमेंट फ्रि कॉलनी क्रमांक सहा येथे असलेले विनापरवाना बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या महापालिका आणि पोलिस अधिकारी यांना अतिक्रमण करणाऱ्यांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

सेटलमेंट फ्रि कॉलनी क्रमांक सहा येथे राहणारे अशोक नंदूरकर आणि अरुण नंदूरकर यांनी विनापरवाना बांधकाम केले आहे. मनपा अतिक्रमण प्रतिबंधक विभाग गुरुवारी दुपारी हे अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. जेसीपीच्या सहाय्याने बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. दरम्यान, येथील लोकांचा विराेध सुरू झाला. मात्र, विरोधाला जुमानता पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण पाडण्यात आले. अतिक्रमण काढल्यानंतर प्रभारी नगर अभियंता गंगाधर दुलंगे सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन थेटे हे निघण्याच्या तयारीत होते. दरम्यान, एक जमाव आला. त्यांनी कागदपत्रे दाखवत दुलंगे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर जमावाने दुलंगे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेले थेटे यांना मारहाण केली. या भांडणात थेटे यांचा युनिफॉर्म फाटला. खांद्यावरील स्टार निघाला. या प्रकरणी सहाय्यक फौजदार म. हनिफ महमदसा गैबू यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद केली. विकास अरुण नंदूरकर, वंदना अरुण नंदूरकर, तृप्ती श्रीकांत जाधव, प्रिया विकास नंदूरकर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्याद द्यायला अधिकारी आलेच नाहीत
सेटलमेंटमधीलप्रकारानंतर मनपाचे गंगाधर दुलंगे, मोहन कांबळे, व्ही. व्ही. जोशी, सतीश एकबोटे, नजीर शेख, एम. एम. क्षीरसागर, एस. बी. खानापुरे आदींनी काढता पाय घेतला. शिवाय मोबाइल बंद करून ठेवला. अतिक्रमण विभागाकडे असलेले पोलिस कर्मचारी मात्र सलगर वस्ती पोलिस ठाण्यात उपाशीपोटी मनपा अधिकाऱ्यांची वाट बघत बसले. अधिकारी येणार नाही असे लक्षात आल्यानंतर अखेर सहाय्यक फौजदार गैबू यांनी फिर्याद दाखल केली. माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या काळात असाच प्रकार घडला होता. त्यावेळी गुडेवार यांनी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसून फिर्याद दिली होती.

आत्महत्येचा प्रयत्न
विनापरवानाबांधकाम पाडताना प्रारंभीच विरोध झाला. तेवढ्यात एका महिलेने बांधकाम पाडता का असे म्हणत रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थित महिला आणि पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांनी या महिलेला वाचवले.
पुढील स्लाईडवर पाहा, अतिक्रमण हटाओ मोहिमेचे इतर Photos