आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॉरेस्टमध्ये दागिन्यांची चोरी, लाख रुपये चोरणार्‍याला पाठलाग करून पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - फॉरेस्ट न्यू तिर्‍हेगाव परिसरातील काशीम अल्लाबक्ष रायचूरकर यांच्या घरातून आठ तोळे सोन्याचे दागिने, मोबाइल, एक हजार रुपये असा ऐवज चोरांनी पळविला. हा प्रकार शनिवारी पहाटे घडला. रायचूरकर यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी रात्री ते जेवण करून झोपी गेले. पहाटेच्या सुमाराला त्यांच्या घरात चोर शिरला. पहाटे साडेतीनच्या सुमाराला घरात आवाज आल्यामुळे त्यांना जाग आली. कोण आहे असा आवाज दिल्यानंतर चोराने बाहेर धूम ठोकली. चोरी झाल्याचे लक्षात येताच कपाटाची पाहणी केली असता आठ तोळे दागिने, पैसे, मोबाइल नाही असे दिसून आले. चालू बाजारभावाप्रमाणे दागिन्यांची किंमत अडीच लाख रुपये होते. पोलिसांनी एक लाख चाळीस हजार रुपयांची नोंद केली आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र बिराजदार तपास करीत आहेत.

लाख रुपये चोरणार्‍याला पाठलाग करून पकडले

जुळ सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्र येथे सदाशिव कोळी एक लाख रुपये भरण्यासाठी गेले होते. काही क्षणात एका तरुणाने त्यांच्या हातातील पैसे हिसकावून घेतले. तेवढय़ाच तडफेने त्यांनी परत पैसे हिसकावून घेतले. पुन्हा चोराने पैसे हिसकावून घेऊन बँकेच्या बाहेर धूम ठोकली. कोळी यांनी आरडाओरड करताच नागरिकांनी त्याला देविका गॅस गोडावूनजवळील मैदानातून पळून जाताना पकडले. हिसका मारून पुन्हा तो पळू लागला. तेथे गस्त घालणार्‍या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले. हा थरार शनिवारी दुपारी बाराच्या सुमाराला घडला. जावेद मुजाम अली (वय 32, रा. विष्णूकृपा झोपडपट्टी, शिवाजीनगर, पुणे) याला अटक झाली आहे.

सदाशिव कोळी (रा. बेडर कन्हैयानगर, मजरेवाडी) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. कोळी यांचे जुळे सोलापुरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत खाते आहे. एक लाख रुपये भरण्यासाठी आल्यानंतर त्यांच्यावर हा प्रसंग गुदरला. गुन्हे शाखेचे सहायक फौजदार महादेव शिंदे, शिवाजी राठोड, हेमंत काटे, सिद्धप्पा पाटील, हब्बू, राजेंद्र बनसोडे, आगावणे, वसंत माने हे पथक शिवजयंती उत्सवानिमित्त पेट्रोलिंग करीत होते. त्याला सर्वांनी मिळून पाठलाग करून पकडले. त्याच्या जवळील एक लाख रुपये जप्त करण्यात आले.

काजलनगरात लाखाची घरफोडी, सोने लंपास
होटगी रस्त्यावरील काजलनगरातील खुशनोद्दा शब्बीर शेख यांच्या घरात एक लाखाची चोरी झाली. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. त्यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. दोन सोन्याच्या बांगड्या, ब्रेसलेट, पर्स व अन्य साहित्य असा सुमारे एक लाखाचा ऐवज यावेळी चोरीस गेल्याचे विजापूर पोलिसांनी सांगितले. शेख या घर बंद करून शुक्रवारी बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान हा प्रकार घडला.