आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरात या आणि फसवून जा..!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दोन हजार गुंतवा महिना अमुक रक्कम कमवा, बेरोजगारांना बसल्याठिकाणी कमावण्याची संधी या नावाने येणार्‍या जाहिराती. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा महिना पाच हजार कमवा, बचत गटात गुंतवणूक करून दामदुपटीने पैसे मिळवा, साखळी पद्धतीने सदस्य तयार करून पैशाचे आमिष दाखवायचे आणि सर्वांना टोपी घालून पळून जायचे, असे प्रकार सोलापुरात वाढले आहेत. नागरिकही आमिषाला बळी पडून फसतात. आर्थिक फटका बसल्यानंतर पोलिसांत धाव घेतात. डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, मध्यवर्गीय परिवारही यात फसले आहेत. अर्थिक गुन्हे शाखेत तब्बल 16 गन्हे दाखल असून अलीकडील सहा महिन्यांत चार गुन्हे नव्याने आलेत. आरोपी काहीच पुरावा मागे ठेवत नाहीत. कार्यालय, चेक, नाव, पत्ता सर्व काही बोगस देतात. तपासात अडचणी येतात. परजिल्हा, अन्य राज्यांतून काही टोळकी येतात. कार्यालय थाटतात. विश्वास संपादन करून गंडवून गायब होतात.
साखळी पद्धतीने होते फसवणूक
कामगार, कष्टकरी वर्ग राहतात तिथे येतात. कार्यालय थाटतात. रजिस्टर कंपनीचा बोर्ड लावतात. आमिष दाखवत जाळ्यात ओडतात. पैसे गुंतविल्यानंतर आगाऊ चेकही देतात. नंतर जाहिरातबाजी होते. साखळी पद्धतीने पैसे गुंतविण्यास सांगतात. काहीना सुरुवातीला एक लाखाला पाच हजार रुपये देतात. काही महिने हा प्रकार सुरू असतो. मोठी रक्कम जमा झाले की रातोरात ही मंडळी गायब होतात. विशेषत: यात फसवणारी मंडळी परप्रांतीय, दक्षिण भारत या भागातील असतात. पुरावा सोडत नाहीत.
मोबाइल, इंटरनेटने होतोय फसवणूक
इंटरनेट (मेल), मोबाइलद्वारे मेसेज येतात. आपण अमूक पैसे जिंकला आहात. त्यासाठी आपण एवढे पैसे गुंतवा. या अकाऊंट नंबरवर पैसे पाठवण्यासाठी पुन्हा मेसेज येतो. आमिषाला बळी पडून पैसे पाठवतो. एटीएमचा कोड नंबर सांगतो, बँकांचे अकाऊंट नंबर देतो. एका क्षणात आपल्या खात्यावरून पैसे गायब होतात. याला नायजेरियन फ्रॉड म्हणतात. पोलिस भाषेत ‘व्हाइट कॉलर गुन्हेगारी’ असेही म्हणले जाते. या टोळीपर्यंत पोलिस पोहोचू शकत नाहीत. याची लिंक दिल्लीपर्यंत असते.
यांचा तपास
मे.स्वामी इनव्हेस्टमेंट आणि फायनान्शियल कंपनी स्थापण्यात आली. एक लाख रुपये गुंतवा महिना पाच हजार कमवा. आमिष दाखवून 45 लाखांचा गंडा घालून दोघेजण पळून गेले. तब्बल 23 लोकांना अशा पद्धतीने फटका बसलाय.

शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यास सांगून 40 लोकांना गंडविले. टकले नावाने फर्म काढले. प्रवर्तक एक्साईस खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याचा परिवारही यात समील. 90 लाखांची फसवणूक झाली.

शासकीय जमिनीवर आरक्षण असताना ती दुसर्‍याला विकून टाकली. यात लाखो रुपयांची फसवणूक झाली. चौथी घटना सीएफएल एजन्सी देण्याच्या आमिषाने सात लाखांची फसवणूक झाली आहे. यात तक्रारदार एक नगरसेवकच आहे.
गुंतवणूक करताना ही काळजी घ्या!
४ गुंतवणूक करताना रिझर्व्ह बँकेची मान्यता अथवा परवाना आहे का? याची खातरजमा करा. पैसे गुंतवायचे असतील तर कागदपत्रांची पाहणी करा. पावती घ्या. नॅशनल बँक, पतसंस्थेत गुंतवा. प्रवर्तक कोण आहेत, आर्थिक भांडवल कसे आहे याही बाबी पडताळून पाहा. पैसे गुंतविण्याअगोदर सल्ला घ्या.’’
राजेंद्र चव्हाण, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा
अर्जावरून चौकशी सुरू
४ न्यू बुधवार पेठ, हनुमाननगर येथील 64 नागरिकांनी आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारी अर्ज दिले आहेत. अधिकारी चौकशी करत आहेत. बचत गटात पैसे गुंतवण्याच्या आमिषाने फसवणूक झाली आहे. 50 लाखांपर्यंत हा आकडा आहे. नागरिकांनी पैसे गुंतवताना काळजी घ्यावी. सावधगिरी बाळगा.’’
काळूराम धांडेकर, पोलिस निरीक्षक, जोडभावी ठाणे
श्रम नको पैसे पाहिजेत...
४चंगळवादामध्ये सर्वांची श्रम नको पैसे पाहिजेत अशी भावना आहे. त्याचा फायदा मार्केटिंग करीत ठकसेन घेतात. गुंतवणूक करताना चौकशी व्हावी. भूलथापांना बळी न पडता योग्य निर्णय घ्यावा.’’
प्रा. विलास बेत, सामाजिक अभ्यासक
काहीच पुरावा दिला नाही
४ हनुमान नगरमधील बचत गटामार्फ त पैसे गुंतवण्यास सांगितल्यानंतर महिलांनी पैसे गुंतविले. सुरुवातीला विश्वास संपादून घेतला. त्यावर बँकेचे कर्ज काढले आणि नंतर सर्व पैसे घेऊन पती-पत्नी पळून गेले. काहीच पुरावा आमच्याकडे नाही. पोलिसांनी तपास करून न्याय द्यावा.’’
झलकसिंग तलानी, पीडित व्यक्ती