आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात गणपती मंडपाजवळ पोलिस नेमणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गणपती उत्सवास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. नवीपेठ, मधला मारुती, कोंतम चौक, राजेंद्र चौक, शिवाजी चौक , रेल्वे स्टेशन, सातरस्ता, विजापूर रस्त्यावरील सैफूल, जुना पुणे नाका, जुना बोरामणी नाका, बाळीवेस या भागात वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन आजपासून वाहतूक पोलिस पॉइंट नेमण्यात येणार आहे, असे साहाय्यक पोलिस आयुक्त मोरेश्वर आत्राम यांनी सांगितले.

मुख्य रस्ते, महत्त्वाचे चौक, बाजारपेठांमध्ये काही गणेश मंडळांनी रस्त्यावरच मंडप टाकले आहेत. त्याठिकाणी वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी सुमारे पन्नास पोलिसांचे पथक विविध ठिकाणी नेमणार आहे. ज्या ठिकाणी रस्ता बंद असेल त्या ठिकाणी बॅरिकेडिंग लावून सूचना देण्यात येतील. पर्यायी मार्गाचा अवलंब नागरिकांनी करावा, असेही आत्राम म्हणाले.

मोकाट जनावरांवर कारवाई
शहरात फिरणार्‍या मोकाट जनावरांवर शुक्रवारपासून कारवाईची मोहीम सुरू झाली. महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून चार मोकाट जनावरांच्या मूळ मालकांवर जोडभावी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मोकाट फिरणारी गुरे कोंडवाड्यात आणून सोडण्यात येतील. मूळ मालकांचा शोध लागल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, असे र्शी. आत्राम म्हणाले.

जुना एम्प्लॉयमेंट चौकात सिग्नल बंद पडला
जुना एम्प्लॉयमेंट चौकातील सिग्नल दोनच दिवसांपूर्वी सुरू झाला. तो शनिवारी बंद पडला. गुरुवार, शुक्रवार दोन दिवस वाहतूक नियोजन झाले. पण, शनिवारपासून पोलिसही थांबत नाही. रविवारी गांधीनगर, सरस्वती चौकात सिग्नल चालू होते. अन्य दहा ठिकाणी बंद होते. आसरा चौकात गणपती उत्सव होईपर्यंत मॅन्युअलद्वारे वाहतूक नियोजन करण्याच्या सूचना आहेत. त्यानसुार कार्यवाही होत नाही. रविवारी आसरा चौकात पोलिसही थांबला नव्हता. मात्र, महावीर चौकात तीन पोलिस थांबले होते, हे विशेष.

पोलिसांची ड्यूटी दररोज बदलणार
एका चौकात किंवा वाहतूक क्रेनवर वारंवार तेच पोलिस दिसतात. काही पोलिसांना मात्र दररोज वेगळ्या चौकात नेमतात. ही पद्धत सोमवारपासून बंद करू. दररोज नव्या चौकात पोलिस नेमण्यात येईल. क्रेनवरील पोलिसांची ड्यूटी दररोज बदलणार असल्याचे श्री.आत्राम यांनी सांगितले.