आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापूरला दिलासा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्या आज सादर झालेल्या अर्थसंकल्पातून सोलापुरातील यंत्रमाग उद्योजक व बेदाणा व्यापार्‍यांना कर सवलतीच्या मुदतवाढीने दिलासा मिळाला आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे, माळढोक अभयारण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. या अंदाजपत्रकाचे सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी स्वागत केले आहे, तर विरोधी भाजपच्या आमदारांनी टीका केली आहे.

यंत्रमाग उद्योगाला ‘व्हॅट’मधून आणखी एक वर्षासाठी वगळण्यात आले आहे. राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू, सोलापूर चादर, टॉवेल आदी वस्तूंवरील कर माफीची सवलत येत्या 31 मार्च 2014 पर्यंत चालू ठेवून मुदतवाढ दिली आहे. तसेच बेदाणे व मनुकांवरील कर सवलतही आणखी एक वर्ष राहणार आहे. ऊस खरेदी करात तीन टक्क्यांवरून पाच टक्के अशी वाढ करून तो निधी दुष्काळ निवारणासाठी वापरण्यात येणार असला तरी ऊस खरेदी कर हा शेतकर्‍यांच्या खिशातूनच जाणार आहे. राज्यातील 23 शहरांच्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी 149 कोटी 78 लाख रुपयांची तरतूद आहे. त्यात सोलापूरचा समावेश आहे. माळढोकसाठी जाहीर झालेला निधी भूसंपादनासाठी की कृत्रिम प्रजनानासाठी याचे स्पष्टीकरण अद्याप झालेले नाही.

सोलापूरला हे मिळाले
*यंत्रमाग उद्योगांना कर माफीची सवलत
*बेदाणे व मनुकांवरील कर सवलत
*शहरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसाठी निधी
*यंत्रमागधारकांच्या वीजदरात सवलतींसाठी 939 कोटी
*माळढोकसाठी 10 कोटी रुपयांचा निधी

यामुळे झाली निराशा
*विडी व सिगारेटवरील कर वाढला
*ऊस खरेदी करात दोन टक्के वाढ