आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवहेलना सुरूच; शवगृहातील मृतदेहाचे नाक उंदराने कुरतडले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर शासकीय रुग्णालयातील शवगृहातील (पी. एम.) मृतदेहाचे नाक उंदराने कुरतडले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याला शासकीय रुग्णालय यंत्रणाच जबाबदार असल्याचे दिसून आले. याबाबत अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

कुठलीही मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनावश्यक जैविक कचरा विल्हेवाटीचा मुद्दा गंभीर बनला आहे. शवगृहाजवळ ते सुटे भाग ठेवले जातात. बायो केमिकल्स कंपनीचे वाहन तेथे येते आणि तो जैविक कचरा विल्हेवाट लावण्यासाठी नेला जातो. कंपनी ते भाग घेऊन जात नाही, तोपर्यंत ते व्यवस्थितपणे ठेवण्याची जबाबदारी शासकीय रुग्णालयाची आहे. मात्र तसे केले जात नाही आणि कंपनीचे वाहन येण्यासाठी एक दिवस जरी विलंब लागला तरी मानवी अवयव अथवा इतर भाग तेथेच पडून असतात. त्यामुळे तेथे अस्वच्छता वाढल्याने घुसी आणि उंदरांचा वावर वाढला. त्यामुळे ते पी. एम.पर्यंत पोहोचू लागले.

गुरुवारी मध्यरात्री घडलेली घटना ही नवीन नसणार यापूर्वीही अशी घटना घडली असेल. मात्र, ते कोणाच्या लक्षात आले नसावे. कारण, अचानक उंदीर येतात आणि असा प्रकार करतात असे शक्य नाही. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. तसेच बेजबाबदारपणाने काम करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

गुरुवारी विजेचा शॉक लागून 24 वर्षीय तरुण आकाश दत्तात्रय गायकवाड याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्यासाठी त्याचा मृतदेह गुरुवारी रात्री शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. रात्रभर तो मृतदेह शवविभागात होता, तेव्हा हा प्रकार घडला. हा तरुण देगाव येथील असल्यामुळे ही वार्ता समजताच शिवसेना जिल्हा युवा सेनेचे युवा प्रमुख गणेश वानकर हे घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांनी ही बाब संबंधित अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. असा प्रकार नेहमीच सुरू असतो. या वेळी रिपाइंचे प्रमोद गायकवाड उपस्थित होते.