आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाकबंगल्यात गैरकृत्य:दोषींवर कारवाई नाही, फक्त समज!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहाचा (डाकबंगला) वापर गैरकृत्यासाठी होत असल्याचे उघडकीस आल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्यात हतबल असल्याचे स्पष्ट होत आहे. 5 जानेवारी रोजी डाकबंगल्यातील रूममध्ये तरुणांनी केलेल्या तोडफोडीचा गुन्हा दाखल केल्याचे अभियंता ए. बी. शिंदे यांनी सांगितले. या प्रकरणातील संबंधित कनिष्ठ अभियंता आणि कर्मचार्‍यांना मात्र समज देण्यात आली आहे. त्यांची बदली करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

डाकबंगल्यात गैरकृत्य सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. अल्पवयीन मुलीला डाकबंगल्याच्या रूममध्ये तीन-तीन दिवस ठेवण्यात येते, पण कोणतीही नोंद नसते. वरिष्ठ अधिकारीही या प्रकाराकडे कानाडोळा करतात. डाकबंगल्यातील रूममध्ये तोडफोडीचा प्रकार वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्यानंतर दोन महिन्यांनी अशा गैरप्रकारांना उजाळा मिळतो. काही कर्मचारी डाकबंगल्यात अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत. त्यांच्या बदल्या करण्याबाबत उदासीनता दिसून येते आहे. डाकबंगल्यात गैरप्रकार चालत असल्याचे उघडकीस आल्यानंतरही अधिकारी कारवाई करण्यात हतबलता व्यक्त करीत आहेत. डाकबंगल्यातील या गैरप्रकाराची पुणे येथील मुख्य अभियंता एकनाथ उगीले यांनी गंभीर दखल घेतल्याचे वृत्त आहे

गुन्हा दाखल, बदली
डाकबंगल्यातील गैरकृत्यांची गंभीर दखल घेतली असून 5 जानेवारी रोजी झालेल्या प्रकाराचा गुन्हा दाखल केला आहे. एक उपअभियंता, एक कनिष्ठ अभियंता आणि चार कर्मचारी अशा सहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांच्याकडून खुलासेही आले आहेत. पुन्हा असे प्रकार घडता कामा नये अन्यथा निलंबित केले जाईल, अशी समज सहा जणांना दिली आहे. फक्त एकाची बदली केली. मनुष्यबळच कमी असल्याने अनेक वर्षांपासून कार्यरत कर्मचार्‍यांची बदली अथवा त्यांच्यावर कारवाई करणे शक्य नाही. जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराचा अहवाल मागितला असून लवकरच त्यांना तो पाठवला जाईल. - ए. बी. शिंदे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

उंटावरून शेळ्या..
या संदर्भात सोलापूरचे अधीक्षक अभियंता मुकुंद सुरकुटवार यांच्याशी संपर्क साधला असता, तेव्हा अगोदर ते म्हणाले की, याबाबत आपण कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलला आहात का? कार्यकारी अभियंता शिंदे यांच्याशी बोलणे झाले पण प्रकार गंभीर असतानाही ते सांगतात, की दोषींना समज दिली आहे. गंभीर प्रकार असताना फक्त समज देऊन चालेल का? असे विचारल्यानंतर सुरकुटवार म्हणाले की, बघतो, माहिती घेतो.

बघतो, माहिती घेतो
शासकीय डाकबंगल्याचा वापर गैरकृत्यासाठी होत असल्याबाबत कार्यकारी अभियंता ए. बी. शिंदे यांना पत्र पाठवले आहे. झालेल्या गैरप्रकाराचा खुलासा करण्यास सांगितले आहे. बघतो, माहिती घेतो.
- मुकुंद सुरकुटवार, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.