आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेपूर्वी घेण्यात येणार्‍या झडतीतही कॉपी आढळल्यास गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी कडक धोरण स्वीकारले आहे. परीक्षा दालनात जाण्यापूर्वी घेण्यात येणार्‍या झडतीत कॉपी आढळली तरी संबंधित विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. गुरुवारपासून बारावी परीक्षा सुरू होत आहे. कॉपीमुक्तीची प्रमुख जबाबदारी केंद्र प्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. परीक्षार्थीकडे कॉपी आढळल्यास परीक्षार्थीवर, परीक्षा केंद्र परिसरात कॉपी आढळल्यास संबंधित केंद्र संचालक व केंद्र प्रमुखांवर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी गेडाम यांनी दिले आहेत.

गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षणाधिकार्‍यांच्या अखत्यारीत 6 भरारी पथकांची नियुक्ती झाली आहे. 84 बैठे पथके नियुक्त करण्यात आली आहेत. उपद्रवी परीक्षा केंद्रांवर ही पथके असतील. परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिक्षण विभागाची तयारी झाली आहे. जगन्नाथ शिवशरण, माध्यमिक शिक्षणाधिकारी

कॉपीमुक्ती अभियान
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांचा इशारा, केंद्र परिसरात 144 कलम, भरारी पथकांचा ‘वॉच’, कॉपीमुक्तीची मुख्य जबाबदारी असणार केंद्रप्रमुखांवर

परीक्षार्थीकडे परीक्षेपूर्वीच कॉपी साहित्य आढळल्यास त्यावर भारतीय दंड संहितामधील कलम 511 व परीक्षेतील गैरप्रकार प्रतिबंधक कायदा 1982 मधील कलम 7 नुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधूनच गुन्हा नोंद करावा.

केंद्र प्रमुखांना सूचना
परीक्षा दालनातील व परिसरातील कागद आदी साहित्य जमा करून जाळून टाकावे.
केंद्र संचालकांनी परीक्षा केंद्रावर विद्यार्थी संख्येनुसार फर्निचर उपलब्ध करावे.
एकही विद्यार्थी जमिनीवर बसून परीक्षा देणार नाही याची दक्षता घ्यावी.
अधिकृत नेमणूक केलेल्या कर्मचार्‍यांशिवाय इतर व्यक्ती फिरणार नाही याची दक्षता घ्यावी.
परीक्षेच्या कामासाठी असलेल्या सर्व व्यक्तींना आपल्या स्वाक्षरीचे ओळखपत्र देण्यात यावे.
पर्यवेक्षकावर केंद्र संचालकांनी योग्य ते सनियंत्रण ठेवावे.

अशी होणार परीक्षार्थीची तपासणी
विद्यार्थ्याला परीक्षा दालनात सोडताना झडती घ्यावी.
पायमोजे, बूट, कमरेचा पट्टा, टोपी, खिसे, कॉलर, परीक्षा पॅड तपासावे.
कपड्यावर, मांडीवर, हातावर लिहिले आहे का याचीही तपासणी करावी.
परीक्षार्थीकडे कागद, पुस्तके आढळल्यास ते काढून घ्यावे.
विद्यार्थिनीची तपासणी स्त्री शिक्षिकेकडून, आडोसा तयार करून करावी.

या कलमांनुसार होणार गुन्हे
परीक्षा केंद्रावर कॉपी आढळल्यास केंद्र प्रमुख व केंद्र संचालकांवर परीक्षेतील गैरप्रकार प्रतिबंधक कायदा 1982 मधील कलम 7, 8 व आयपीसी मधील कलम 34, 188, 217 व 511 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. काही अडचणी निर्माण झाल्यास दक्षता समितीमधील माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी आहे.

हेल्पलाइनची सुविधा
हेल्प लाइनची सुविधा सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधीत असेल.
जे. एस. शिवशरण (शिक्षणाधिकारी): 9881345400
शिवाजी चंदनशिवे (उपशिक्षणाधिकारी ) : 7709401698
व्ही. आर. सरगर (उपशिक्षणाधिकारी) : 9890548748
नागणसुरे (विस्तार अधिकारी): 7744922808
सूर्यकांत सुतार (विस्तार अधिकारी ) : 9850564844
स्वाती हवेली (अधीक्षक) : 9730501042