आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रमागधारक संघाचा चेहरा बदलायला हवा; इमारत मोठी, पण जागृतीच्या कार्यक्रमांसाठी उदासीनता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चादरही सोलापूरची ओळख. त्याच्या उत्पादनातील मंडळी म्हणजे जणू या शहराच्या अर्थवाहिन्या. तेजी-मंदी, जीवघेणी स्पर्धा, वाढते तंत्रज्ञान या बाबींचा सामना करत ही मंडळी तग धरून आहेत.
शासन दरबारी मागण्या मांडणे आणि पाठपुरावा करण्यासाठी संघटना आहे. त्याचे नाव यंत्रमागधारक संघ. त्याची मोठी इमारत आहे. बडे कारखानदार त्याचे पदाधिकारी आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट की, या इमारतीत माणसांचे गजबजलेपण नाही. अडचणींवर मात करणाऱ्या चर्चा नाहीत. मासिक बैठका दूरच, वार्षिक सभा नाहीत.
केंद्रात, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वस्त्रोद्योगाला काही देण्यासाठी मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्याच्या प्रतिक्रिया नाहीत. नव्या लोकप्रतिनिधींचे स्वागतही नाही. या सर्व घटना, घडामोडी पाहता, संघाचा चेहराही बदलावा, असे काही उत्पादकांना वाटते. २००२ पासून संघाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी कायम आहे. त्यांच्यात कुठलाच बदल झालेला नाही. ६०० कारखानदार आणि सुमारे दीड लाख कामगारांचा डोलारा उचलणाऱ्या संघाकडे कुठला कार्यक्रम नाही, याचेच काही उत्पादकांना आश्चर्य वाटते.

^यंत्रमागधारक संघात विशिष्ट व्यक्तींचीच मक्तेदारी आहे. इतरांना बोलूही देत नाहीत. परंतु यंत्रमाग घटकांच्या हितासाठी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्यांना सोलापूरला आणण्याचे माझे प्रयत्न आहेत. त्यांच्याकडून काही तरी मिळवून घेण्याचा उद्देश आहे.'' श्रीनिवासदायमा, टॉवेलउत्पादक

लोकप्रतिनिधींचा सत्कार गोदामात
यंत्रमागधारक संघ आणि टीडीएफच्या इमारतीत मोठाले सभागृह असताना खासदार अॅड. शरद बनसोडे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा सत्कार एका कारखानदाराच्या गोदामात झाला. या कार्यक्रमासाठी संघाचे अध्यक्ष, टीडीएफचे अध्यक्षही नव्हते. नूतन लोकप्रतिनिधी स्वत:हून एमआयडीसीत आले. कारखानदारांच्या अडचणी ऐकून घेतल्या. उद्योगाची स्थिती प्रत्यक्ष पाहिली. अशा वेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका वेगळी का दिसून आली, हे समजत नाही.
संघाची इमारत मोठी : कार्यक्रम मात्र नाहीत
यंत्रमाग घटकांना पायाभूत सुविधा देण्याच्या योजनेतून यंत्रमागधारक संघ आणि टेक्स्टाइल डेव्हलपमेंट फाउंडेशन या दोन्ही संस्थांच्या इमारती उभ्या राहिल्या. ‘टीडीएफ’मध्ये असलेल्या दालनाचा लाभ यंत्रमागधारकांपेक्षा रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीने जादा घेतला. फाउंडेशनची स्थितीही संघापेक्षा वेगळी नाही. सुरुवातीच्या काळात ज्या पद्धतीने कार्यक्रम घेतले, तशी स्थिती आता दिसत नाही. ही वस्तुस्थिती त्यांचे पदाधिकारीही स्वीकारतात.
आपत्ती मोठी : चर्चा नाही
वस्त्रोद्योगावर सध्या मंदीची खूप मोठी आपत्ती कोसळली. पक्क्या मालाला उठाव नसल्याने उत्पादित मालाने गोदामे भरली. त्यावर उपायांची चर्चा अद्याप नाही. कुठल्या तज्ज्ञाला बोलावले जात नाही. २००० च्या सुमारास अशीच मंदी आली होती. त्या वेळी यंत्रमाग संरक्षण समितीने रान उठवले होते. त्याची दखल घेऊन प्रकाश आवाडे समितीची नियुक्ती झाली. त्यांनी दिलेल्या पॅकेजचा लाभ राज्यातील यंत्रमाग घटकांना झाला. परंतु संघाची भूमिका तेव्हाही चूप आणि आताही चूप...