आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - केगाव येथे उजनी कालव्याच्या कामासाठी आरक्षित जागेवर अतिक्रमण केल्यामुळे सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड इन्स्टिट्यूटला उजनी कालवा विभाग क्रमांक आठच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी दोन कोटी 88 लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. 30 जानेवारी रोजी अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल, असे अधिकार्यांनी सांगितले.
केगाव येथे गट क्रमांक 44 व 45 मधील 10.51 हेक्टर इतकी जमीन उजनी कालव्यासाठी संपादित करण्यात आली होती. या परिसरात सिंहगड इन्स्टिट्यूटची भव्य इमारत उभारण्यात आली. संपादित जागेभोवती शासनाने पूर्वीच तारेचे कुंपण मारले होते. सिंहगडची इमारत उभारताना शासनाच्या जागेभोवती तारेचे कुंपण मारून जागेवर अतिक्रमण करण्यात आले. अतिक्रमण काढण्यासाठी उजनी कालवा कार्यालयाने 2009 पासून शिक्षण संस्थेसोबत पत्रव्यवहार केला. यानंतर संस्थेने ती जागा भाडेतत्त्वावर देण्याची मागणी केली. मात्र ती जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली नाही. कंटाळून शासनाने 27 फेब्रुवारी 2012 रोजी फौजदारी गुन्ह्याअंतर्गत कारवाई होईल, अशी सूचना दिली. यानंतर शासनाने 17 मार्च 2012 रोजी दोन कोटी 88 लाख रुपये भाडे व दंडापोटी भरण्याची नोटीस पाठवली. अतिक्रमण काढेपर्यंत शासनाच्या नियमानुसार भाडे आकारणी व दंड आकारणी चालू राहील, अशी सूचना दिली. मात्र, कारवाई करण्यात आली नाही. 22 जानेवारी 2013 रोजी अंतिम नोटीस देण्यात आली आणि त्याद्वारे त्याच दिवसापासून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल असे सांगितले. शासनाने फक्त नोटीस बजावली.
2009 पासूनचे भाडे घेणार
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महांमडळाच्या नियामक मंडळाच्या 42 व्या बैठकीमध्ये महामंडळाच्या ताब्यातील जमिनी वापरण्याचे, वेगवेगळ्या कारणासाठीचे दर प्रस्तावित केलेले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाच्या ताब्यातील जमिनीला भाड्याएवढीच रक्कम दंड म्हणून वसूल करण्याचा निर्णय शासनाने घेतला. संस्थेच्या ताब्यात शासनाची 2.54 हेक्टर इतकी जमीन असल्याचे शासनाचे मत आहे. त्यानुसार 2009 पासून हिशेब करून दोन कोटी 88 लाख 75 हजार रुपये दंड लावण्यात आला आहे.
...तर मनविसे आंदोलन करणार
सिंहगड हे खूप मोठे इन्स्टिट्यूट आहे. अशा संस्थेने शासनाच्या जागेवर अतिक्रमण करणे योग्य नाही. अतिक्रमण काढताना इतरांच्या बाबतीत कारवाई तातडीने केली जाते. मात्र, येथे एवढी संथ कारवाई का केली जात आहे. अतिक्रमण करणार्या सर्वांवर कारवाई व्हावी, अतिक्रमण काढावे आणि दंडही वसूल करावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल.’’
गणेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, मनविसे
न्याय समान हवा
केगाव येथे उजनी कालव्यासाठी संपादित जागेवर अनेक वर्षांपासून अनेकांकडून मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. शासनाने येथील काही जमीन एका संस्थेला भाडेतत्त्वावर दिली आहे. आमच्या संस्थेने तेथे अतिक्रमण केले नाही. विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आम्ही तारेचे कुंपण मारले आहे. उलट ती जागा भाडेतत्त्वावर देण्याची मागणी आमची आहे किंवा शासनाच्या नियमानुसार विकत घेण्याची आमची तयारी आहे. मात्र शासन एकाला एक न्याय आणि आम्हाला एक न्याय देत आहे. शासनाने न्यायाची समानता ठेवावी.’’
प्रदीप मोरे, प्रशासकीय अधिकारी, सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ, सोलापूर
आज कारवाई
मी ऑक्टोबर 2012 मध्ये रु जू झालो. तेव्हापासून या विषयाचा पाठपुरावा सुरू आहे. पूर्वी काय झाले माहीत नाही. आमच्या 22 तारखेच्या अंतिम नोटिसीनंतर, स्नेहसंमेलन सुरू असल्याने 29 जानेवारीपर्यंत अतिक्रमण काढून घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. माणुसकीच्या नात्याने आम्ही चार दिवस थांबलो. मी सध्या मुंबईत आहे. 30 जानेवारी रोजी संबंधित अधिकार्यांना पाठवून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करणार आहे. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार दंडही वसूल करण्यात येईल.’’
बी. एस. बिराजदार, कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्रमांक 8, सोलापूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.