आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur Jalgaon Railway No Provision In The State Budget

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापूर-जळगाव लोहमार्गाला ठेंगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केंद्राप्रमाणे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातही राज्यातील रेल्वे प्रकल्पास चालना देण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. बुधवारी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर-जळगाव या रेल्वे मार्गाला निधी मिळू शकलेला नाही. 2013च्या अर्थसंकल्पात राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांना निधी देऊ, असे शासनाने सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात रेल्वे प्रकल्पांना रेड सिग्नल मिळाला. यामुळे सोलापूरसह मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडण्यासाठी सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने 2008-09 मध्ये सोलापूर -जळगाव या 468 किमी मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर या मार्गाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे 2012 मध्ये पाठवण्यात आला. रेल्वे बोर्डाने (दिल्ली) या प्रकल्पासाठी निधी द्यावा म्हणून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून दिला. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातही या प्रकल्पाला निधी तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोलापूर-जळगाव मार्गासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.


रेल्वेला हवी राज्याची मदत
सोलापूर -जळगाव या प्रकल्पासाठी 3500 कोटी खर्च अपेक्षित आहे (2008 व 9 वर्षाच्या प्रस्तावातील आकडा, आता याची किंमत वाढलेली आहे). रेल्वे मंत्रालयाचे काही प्रकल्प हे राज्य सरकारच्या मदतीने पूर्ण केले जातात. अशा प्रकल्पातील अर्धा खर्च हा राज्य सरकारने द्यायचा असतो, तर उरलेला खर्च रेल्वे मंत्रालयाने करावयाचा असतो. अशा प्रकल्पास राज्य सरकारने मदत केल्यानंतरच रेल्वे मंत्रालय अशा प्रकल्पाच्या कामास सुरुवात करते. अन्यथा तो प्रकल्प गुंडाळला जातो.


तुळजापूर तीर्थक्षेत्रासाठी लाभदायक
सोलापूर -जळगाव रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा जोडले जाणार आहे.तसेच दक्षिण भारताशी थेट संपर्क साधला जाणार आहे. सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, बीड, जालना आदी महत्त्वाची शहरे रेल्वेने जोडली जातील. शिवाय राज्यातील साडेतीन पीठांपैकी एक असलेले तुळजापूर हे धार्मिक क्षेत्र रेल्वेच्या नकाशावर आले असते. यामुळे तुळजापूरचा विकास शिर्डीच्या धर्तीवर झाला असता.


पंढरपूर-बारामती मार्गाची प्रतीक्षा
पंढरपूर -लोणंद या 152 किमी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले असून मंजुरीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आहे. या मार्गामुळे पंढरपूर, माळशिरस, नातेपुते, बारामती, फलटण व लोणंद ही शहरे जोडली जाणार आहेत. 250 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पातील बारामती ते लोणंद मार्गाच्या खर्चास शासनाने मंजुरी दिली असल्यामुळे बारामती -लोणंद मार्गचे काम सुरू झाले आहे. यातील 43 किमी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. इतर कामही प्रगतिपथावर आहे. मात्र पंढरपूर - बारामती या 56 किमी रेल्वेमार्गास अद्याप राज्य शासनाने कोणताही निधी दिलेला नाही. त्यामुळे तोही प्रतीक्षेत आहे.


नव्या मार्गामुळे वेळेची बचत
सोलापूरहून जळगावला जाण्यासाठी थेट रेल्वे मार्ग नाही.दौंड मार्गे जाण्यासाठी 9 तास लागतात. नविन मार्गामुळे हे अंतर कमी होवून त्यासाठी केवळ साडेसहातास लागले असते.अडीच तासांची बचत होणार आहे.