आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉकेल गरिबांसाठी नव्हे, माफियांसाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गरिबांना देण्यात येणारे रॉकेल रेशन दुकानदारांच्या चलाखीमुळे रॉकेल माफियांच्या घरात जात असल्याचे निदर्शनास येत आहे. सर्वसामान्यांची ही पिळवणूक गेल्या अनेक महिन्यापांसून होत असूनही अन्न व धान्य पुरवठा विभागाकडून कारवाई केली जात नसल्यामुळे रेशन दुकानदार व संबंधित अधिकारी मस्त झाले आहेत. मध्यंतरी झालेले रॉकेल माफियांचे प्रकरण सर्वर्शुत आहे. याबाबतीत काही गंभीर प्रकार होऊनही रॉकेल माफियांना अजूनही रॉकेल पुरवठा केला जात आहे.

गरिबांसाठी शासनाकडून रॉकेल दिले जाते. संबंधित रेशन दुकानदारांकडून भ्रष्टाचार केला जात असल्याचे उघड झाले आहे. दर दोन महिन्यांनी रॉकेलचा कोटा कमी-जास्त होतो. त्याबाबतचा तक्ता प्रत्येक रेशन दुकानासमोर लावणे बंधनकारक असताना एकही दुकानदार असे करीत नाही. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी या तक्त्यापासून वंचित आहे. पुरवठा कमी-अधिक झाला की त्या नियमानुसार लाभार्थींना रॉकेल मिळत नाही. कोटा कमी झाल्याचे कारण पुढे करून लाभार्थींना रॉकेलचे कमी वाटप केले जाते. कायद्याची, नियमांची भाषा केली की तेवढय़ांनाच योग्य पद्धतीने रॉकेल दिले जाते. वाटपामध्ये विविध प्रकारे भ्रष्टाचार करून रेशन दुकानदार आणि संबंधित अधिकारी नागरिकांची पिळवणूक आणि शासनाची फसवणूक करीत आहेत.
मापातही पाप
- लाभार्थींचा डबा रॉकेल गाडीच्या नळाला थेट न लावता माप भरण्यासाठी खाली ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, असे न करता थेट त्या नळाला डबा लावला जातो आणि फेस ठेवून रॉकेलचे वाटप केले जाते. फेसामुळे रॉकेल कमी येते. याबाबत विचारणा केल्यास नागरिकांना उद्धटपणे उत्तरे दिली जातात, रॉकेलही दिले जात नाही. त्यामुळे सहसा नागरिक आक्षेप घेत नाहीत.
पावती, नोंदवही घरात - रॉकेल वाटप करताना लाभार्थींना सरकारी नियमाप्रमाणे मुख्य छापील पावती देणे अनिवार्य आहे आणि दुय्यम पावती (कार्बन कॉपी) ही सरकारी ऑडिटसाठी असते. त्यावर लाभार्थीची स्वाक्षरी अन्यथा अंगठा घेतला जातो. मध्यंतरी स्वाक्षरी आणि अंगठा घेण्याची औपचारिकता पार पाडण्यात आली. कालांतराने छापील पावती देणे व दुय्यम पावतीवर स्वाक्षरी, अंगठा घेणे तर दूरच राहिले, परंतु ती नोंदवहीसुद्धा ठेवली जात नाही. घरी गेल्यानंतर मनमानी पद्धतीने पावत्या करून सरकार आणि जनतेला फसवण्याचा प्रकार करून मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे उघड होत आहे.
बनावट शिधापत्रिका - नई जिंदगी परिसरात बनावट शिधापत्रिकाचा वापर सर्रास होत असल्याचे नागरिकांचे मत आहे. मात्र, उघडपणे सांगण्यास नागरिक तयार नाहीत. या बनावट शिधापत्रिकाचा वापर करून शासनाकडून रॉकेल व धान्यसाठा लुटण्याचा प्रकार सुरू आहे. याला कोठेतरी आळा बसण्याची गरज आहे.
लिटरमागे 80 पैशांची लूट - शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे तर कधीच रॉकेलचे वाटप होत नाही. मात्र, जेवढेही वाटप होते त्यातही लूट केली जाते. रॉकेलचा प्रतिलिटर दर 15.20 पैसे असा होता. सध्या यात वाढ झाली असून 15.49 पैसे दर असल्याचे पुरवठा विभागातील संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. ही वाढ होऊन आठवडाच झाला आहे. जेव्हा 15 रुपये 20 पैसे दर होता, तेव्हा दुकानदार 16 रुपये वसूल करायचे. सध्याही तेवढीच रक्कम वसूल केली जात आहे. यातून रेशन दुकानदारांना दरमहा हजारो रुपयांची कमाई होत आहे. याकडे पुरवठा कार्यालय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे उघड होत आहे.