आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हीच ती कविता, ज्यात माझ्याच भावना उतरल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कविता व प्रेम या विषयी तरुणाईचं नातं मोरपिसासारखे असतं. तारुण्यात कविता न करतो तो तरुण कसला. पहिले प्रेम अनेकांनी स्वरचित कवितेद्वारेच प्रगट केलेले असते. स्वरचित नाहीच जमले तर आधार असतो प्रेमकवितांचा. प्रेमपत्र आणि कविता यांचेही मग नाते जमून जाते. मग मंगेश पाडगावकरांच्या कवितांवर जीव जडतो. प्रत्येकाला वाटते हीच ती कविता, ज्यात माझ्याच भावना प्रतिबिंबित झालेल्या.
बोलगाणी हा पाडगावकरांच्या कवितांचा असाच एक अफलातून कवितासंग्रह. झुळझुळणार्‍या झर्‍याला मनापासून ताल द्या, मुका घ्यायला फूल आलं , त्याला आपले गाल द्या ! कसं अंग शिरशिरवून जातात नं या ओळी. मग प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं असे म्हणतच अनेकजण प्रेमात पडतात. मी तिला विचारलं, तिने लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं! असो की त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की ! मला सांगा, तुमचं काय गेलं? घरात जागा नसेल, त्यांचे चालणारचं टॅक्सीत प्रकरण! ते थोडेच बसणार आहेत पाणिनीचं घोकीत व्याकरण. कानटोपी घातली म्हणून फूलं काय फुलणार नाहीत तुमच्या रूद्राक्षांना भिऊन पाखरं काय झुलणारं नाहीत? अशा रोखठोक भाषेत प्रेमावर भाष्य करणारे पाडगावकर म्हणून तर तरुणाईच्या गळ्यातील ताईत होऊन जातात.
म्हातारपणावरचं तरुण गाणं.
प्रेम करण्याला वयाचे बंधन नसतेच मुळी, असे सांगणारे पाडगावकर ‘म्हातारपणावरचं तरुण गाणं’ या कवितेतून म्हणतात, तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा, काय प्यायचं ते तुम्ही ठरवा, त्या आधी एवढंच तुमच्या कानात सांगतो, वय तुमचं साठ असो वा सत्तर असो, तिच्यासाठी फुलांची आणा वेणी, मोरासारखा अंधार फुलून आल्यानंतर मजा आणते थोडीशी काजूफेणी.
प्रेम कधी रूसणं असतं
पाडगावकरांची कविता ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ ही प्रत्येकाला जणू तोंडपाठच आहे. मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं ! तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीनं, एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असाल गोडीनं, प्रेम कधी रूसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं, प्रेम कधी भांडतंसुद्धा, निळं चांदणं सांडतंसुद्धा.