आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Lok Sabha Constituncy News In Marathi, Sushilkumar Shinde, Congress

अपक्ष उमेदवार म्हणतात, लोकसभेचे स्वप्न; पण दिल्लीच पाहिली नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिल्लीचा मोह भल्या भल्यांना आवरता येत नाही. प्रत्येकाला वाटते दिल्लीला एकदा गेलेच पाहिजे. नेत्यांसाठीतर दिल्ली खासच! पण तेथेही भल्या भल्यांचा मेळ बसत नाही. तरीही दिल्लीत पोहोचण्याची धडपड प्रत्येकाची असते. सोलापुरातून दिल्लीतच नव्हे तर थेट संसदेत जाण्यासाठी अपक्षांची एकच भाऊगर्दी झाली आहे. त्यातील 11 अपक्ष उमेदवारांपैकी निम्या मंडळींनी अजून दिल्ली पाहिलीच नाही. जे पाहिले, त्यांच्या एक-दोन चकरा झाल्या. मतदारांनी कौल दिला तर आमचीही दिल्ली दूर नाही, असे अपक्षांचे म्हणणे आहे.
देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते अँड. शरद बनसोडे, आपचे ललित बाबर, बसपचे अँड. संजीव सदाफुले आणि बहुजन मुक्ती परिषदेचे पुंडलिक वाघमारे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या समवेत तब्बल 11 अपक्ष उमेदवार आहेत. काही चळवळीतील कार्यकर्ते आहेत, तर काही सामाजिक कार्यकर्ते. एक म्हणतात, समाजाची ताकद दाखवायची आहे. दुसरे म्हणतात, अस्तित्व सिद्ध करायचे आहे. त्यासाठीच दिल्लीला जायचे आहे.
गृहमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे सध्या दिल्लीतच असतात. त्यांना दिल्ली नवीन नाही. पण असे उमेदवार रिंगणात आहेत की, त्यांनी कधी दिल्ली पाहिलीच नाही. अशा उमेदवारांनी चक्क मतदारच आम्हाला दिल्लीला धाडतील असा भाबडा आशावाद बाळगला आहे.
एकमेव महिला उमेदवार
अपक्ष उमेदवार सुनीता उघडे या खासदारकीसाठी सोलापूर मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत. मतदारांनी संधी दिल्यास खासदार होण्याचे स्वप्न असले तरी त्यांनी यापूर्वी एकदाही दिल्ली पाहिली नाही. बॅलेट युनिटवर शेवटी असलेले अपक्ष उमेदवार शिवाजी सोनवणे हे खासदारकीसाठी रिंगणात आहेत. 15 वर्षांपूर्वी खासगी कामासाठी ते दिल्लीस गेल्याचे सांगत मतदारांनी संधी दिल्यास पुन्हा दिल्ली दूर नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले.