आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शीत अंगावर पावडर टाकून शेतकर्‍याला लुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - अंगावर खाज सुटण्याची पावडर टाकून शेतकर्‍याजवळील 30 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना बार्शीत तुळजापूर रोडवर भरदिवसा पावणेबाराच्या सुमारास घडली. याबाबत युवराज मनोहर पाटील (वय 30, रा.पाटील प्लॉट, शिवाजीनगर बार्शी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शेतीच्या कामासाठी सोने तारण ठेवून कर्ज काढण्याच्या इराद्याने युवराज पाटील बस स्टॅण्डसमोरच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियात सकाळी 11 च्या सुमारास गेले. त्यांनी आपल्या सोबत एका कॅरिबॅगमध्ये साडेतीस तोळे सोने घेतले होते. बँकेत मॅनेजर अजून आले नसल्याचे समजताच ते आपल्या तुळजापूर रोडवरील पाटील ट्रेडर्स या दुकानी गेले. तेथे काही वेळ थांबून नंतर पुन्हा ते सव्वाअकरा-साडेअकराच्या सुमारास बँकेत गेले.
प्रभारी बँक मॅनेजरने पाटील यांना, बँकेचा सोनार आज येणार नाही. सोमवारी या, असे सांगितले. त्यामुळे दागिने असलेली कॅरिबॅग घेऊन ते बँकेच्या बाहेर आले. मोटारसायकलकडे जाताना अचानक त्यांच्या पाठीत जोरात खाज सुरू झाली. हे सहन न झाल्याने ते मोटारसायकलने ताबडतोब तुळजापूर रोडवरील त्यांचे मित्र दुग्रेश गुळवे यांच्या महालक्ष्मी एजन्सी या दुकानात गेले. तेथे जावून दागिने असलेली कॅरिबॅग काऊंटरजवळ असलेल्या खुर्चीवर ठेवली. त्याचवेळी रस्त्यावरून जाणार्‍या चुलतभावाला रणजित पाटीलला बोलावले. पाठ खाजवित असताना एक अनोळखी व्यक्ती दुकानात आली. त्याने पाटील बंधूंची नजर चुकवून सोन्याचे दागिने ठेवलेली कॅरिबॅग लंपास केली.
भरदिवसा चोरीने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पोलिस फिर्यादीनुसार, दागिन्यांची किंमत 7,62,500 रुपये एवढी असली तरी बाजारभावाप्रमाणे ही किंमत सुमारे 9 लाखांपर्यंत होते. चोरीची घटना समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिदास पवार, पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी घटनास्थळी तसेच बँकेत जाऊन पाहणी व चौकशी केली. दरम्यान या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तोडे, गंठण, मोराचे पदक आणि राणीहार..
युवराज यांनी चोरट्यास ओझरते पाहिले आहे. त्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास करण्यात येत आहे. दरम्यान, चोरीस गेलेल्या दागिन्यांत सोन्याचे तोडे, गंठण, मोराचे पदक, राणीहार, चेन, नेकलेस आदी 30.5 तोळे सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे.