आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदरशांतून आधुनिक शिक्षण सुरू; देशाच्या शिक्षण क्षेत्रासाठी 40 हजार कोटींची तरतूद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आदिवासी, दलित, अल्पसंख्याक यांचा शिक्षणातील टक्का तुलनेने कमी आहे. हे लक्षात घेत सर्वांसाठी शिक्षण योजनेसाठी दरवर्षी तब्बल 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. त्याचबरोबर मदरशांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण ही योजनाही देशभरात सुरू होत आहे. सोलापुरातील चार तर महाराष्ट्रातील 43 मदरशांचा समावेश यात आहे. मदरशांमधून आधुनिक शिक्षण मिळावे, हा उद्देश असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे सांगितले.

होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे मौलाना आझाद पॉलिटेक्निकच्या नूतन इमारतीचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते सायंकाळी झाले, त्यावेळी ते बोलत होते.

श्री. पवार पुढे म्हणाले, ‘‘मौलाना आझाद यांनी शिक्षण क्षेत्र सार्वत्रिक करण्यासाठी कायदा करण्याचा विचार मांडला होता. शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले पाहिजे, ही काळजी यामागे होती. आज याच दिशेने पाऊल टाकताना 40 हजार कोटी रुपयांची दरवर्षी तरतूद करण्यात येत आहे. इतक्या रकमेची तरतूद कशी होणार ही चिंता बैठकीवेळी निश्चित होती. मात्र, एखादे काम मागे राहिले तरी चालेल, पण शिक्षणासाठी आवश्यक तो खर्च करणे हेच अपेक्षित आहे. कारण तरुणांच्या शक्तीमधूनच देशासाठीची संपत्ती तयार होते. ज्ञान हेच भांडवल असणार आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात आज व्यापारी वृत्ती दिसून येते आहे, ही खंत आहे. ही वृत्ती बाजूला सारत आधुनिक शिक्षण देत तरुण पिढीला तयार केले पाहिजे, जी देश उभारणीसाठी महत्त्वाची ठरेल.’’

भविष्याचा वेध घ्यावा : शिंदे

अध्यक्षस्थानी असलेले केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, भविष्याचा वेध घेत पुढे जाणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून देश उभा राहील ही भूमिका मौलाना आझाद यांनी मांडली होती. समाज मागासलेला आहे. तो शिक्षणाच्या माध्यमातूनच पुढे नेला पाहिजे, ही राष्ट्रीय भूमिका आझाद पॉलिटेक्निकच्या उभारणीतूनही दिसून येते आहे. एनटीपीसीच्या उभारणीतून होटगी हे औद्योगिकरणाचे नवे केंद्र म्हणून सामोरे येईल. एनटीपीसीमधील तंत्रशिक्षणाला आणखी दोन वष्रे मुदतवाढ मिळणार आहे. त्यानंतर ही संस्था स्वयं अर्थसहाय्यीत व्हावी, अशी अपेक्षा आहे.

या वेळी पालकमंत्री दिलीप सोपल, महापौर अलका राठोड, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार दिलीप माने, आमदार प्रणिती शिंदे, आमदार दीपक साळुंखे, भारत भालके, राजन पाटील, बॉंम्बे र्मकंटाइल बॅंकेचे अध्यक्ष लालजान बादशाह, उपाध्यक्ष सय्यद सलीम बादशाह, मौलाना आझाद पॉलिटेक्निकचे संस्थापक अध्यक्ष कय्युम बुर्‍हाण, उपाध्यक्ष नासीर खलिफा, सचिव अमिरोद्दिन शेख, मुश्ताक अहमद चौधरी, शकील चिडगुंपी, प्राचार्य विनय अंबलगी, होटगीचे सरपंच महानंदा पाटील, उपसरपंच रामप्पा चिवडशेट्टी उपस्थित होते. श्री. बुर्‍हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

पॉलिटेक्निकला 75 लाख
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून आझाद पॉलिटेक्निकच्या विकासासाठी 50 लाख रुपये तर इमारतीसाठी 25 लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा श्री. पवार यांनी केली. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी उपेक्षित व अल्पसंख्याक समाजातील काही मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी, अशी अटही त्यांनी घातली. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील 36 हजार विद्यार्थ्यांना शुल्क माफी मिळाली. यासाठी ट्रस्टने सहा कोटी रुपये दिले.

पुढील स्लाइडमध्ये सुशीलकुमार पवारांना राजकीय गुरू मानतात.