आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षाने महापालिकेची सभाच केली बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सुशील रसिक सभागृहाचे झालेले बेकायदा बांधकाम आणि महापौर अलका राठोड यांच्या घराचे विनापरवाना बांधकाम, यामुळे विरोधक कोंडीत पकडतील म्हणून सत्ताधार्‍यांनी मंगळवारी दुखवट्याचा आधार घेत सभाच गुंडाळून टाकली. महापौर राठोड यांनी दुपारी 4.30 वाजता सर्वसाधारण सभा सुरू केली. मात्र कोरमअभावी ती तहकूबही केली. अध्र्या तासाने पुन्हा सभा सुरू झाली आणि दुखवटा सादर करून सभा स्थगित झाली. यापूर्वी दुखवट्यावरून सभा स्थगित न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सभागृहातील विरोधी वातावरण लक्षात घेऊन सत्ताधार्‍यांनी सभा स्थगित केली.

साडेचार वाजता सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपचे जगदीश पाटील, सुरेश पाटील, बसपचे आनंद चंदनशिवे आणि काँग्रेसचे जयकुमार माने हे चार सदस्य उपस्थित होते. अन्य 98 नगरसेवक गैरहजर होते. महापौर अलका राठोड आल्या आणि कोरम पाहून अर्धा तासासाठी सभा तहकूब केली. दुसर्‍यांदा सभा सुरू झाली, तेव्हाही सदस्यसंख्या चाळीसहून कमी होती. तेव्हा तणावात दिसत असलेल्या महापौर अलका राठोड यांनी दुखवटा सादर करून सर्वसाधारण सभा तहकूब केली.

रजिस्टरवर कोरम पूर्ण
कोरमअभावी सभा तहकूब करण्याची नामुष्की महापौरांवर आली. सभा तहकूब झाल्यानंतर महापालिकेच्या सेवकांकडून रजिस्टर घेऊन त्यावर ‘हजर’ असल्याची स्वाक्षरी करताना सर्वपक्षीय नगरसेवक आढळले. काहींनी तर महापौर कक्षात महापौरांच्या समोरच स्वाक्षरी केली.

धिक्काराच्या घोषणा
महापौरांनी दुसर्‍यांदा सभा सुरू केली तेव्हा भाजप आणि बसपच्या सदस्यांनी मिळून धिक्काराचे फलक परिधान केलेले होते. ‘बेकायदेशीर बांधकाम करणार्‍या महापौरांचा धिक्कार असो’, ‘बेकायदेशीर बांधकाम करणार्‍या पदाधिकार्‍यांचा धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या.

गुडेवारांच्या काळात एकदाच चालली सभा
मंगळवारी जानेवारी महिन्यातील सभा बोलावण्यात आली होती. त्यात सात रस्ता येथील सिटीबस डेपो बांधणे, घरकुल योजना, 28 कोटींची विकास कामे आदी विषय होते. सभा तहकूब केल्याने ती कामे पुढे गेली. आयुक्त गुडेवार हे पदभार घेऊन सात महिने झाले. या काळात फक्त एकवेळच सभा चालली. बहुतेक सभा तहकूब करण्यात आल्या. त्यामुळे पदाधिकार्‍यांनी मंजूर करावयाचे विषय आयुक्तांकडे आपसूकच गेले आहेत.