आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी' पाठपुरावा: सोलापुरातील महावीर चौकात सिग्नल सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- होटगी रस्त्यावरील महावीर चौकातील सिग्नल दिवे सोमवारी पोलिसांनी सुरू केले. याशिवाय आसरा चौक व गांधीनगर चौकातील दिव्यांची महापालिका विद्युत विभागाने तपासणी केली. मागील एकवीस दिवसांपासून ‘दिव्य मराठी’ सिग्नल दिवे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत.

पोलिस आणि विद्युत विभागाच्या पथकाने पाहणी केली. गुरूनानक चौकाकडून पत्रकार भवन चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर पिवळा दिवा लागत नव्हता. तत्काळ दिवा आणून बसवल्यानंतर सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ यावेळेत दिवे सुरू होते. नेहमी होणारी वाहतुकीची कोंडी टळली. याशिवाय आसरा चौक व गांधीनगर चौकातील दिव्यांची पाहणी करून आसरा चौकातील दिवे लावण्यात आले. दोनही चौकांतील दिवे सुरू होण्याची चिन्हे आहेत.

शांती चौकातील दिवे दररोज सायंकाळी चालू करण्यात येतात. रात्री सातनंतर अवजड वाहने शहरात येतात. अक्कलकोट रस्ता व हैदराबाद रस्ता या दोनही मार्गांवरील जड वाहने एकदम आले की टायमिंग चुकते. त्याची दुरुस्ती सुरू आहे. आम्रपाली चौकातील दिवेही ओके झाले आहेत. तेही सुरू होतील, अशी माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील (उत्तर विभाग) यांनी दिली. आसरा चौक व गांधीनगर चौकातील सिग्नल यंत्रणा लवकरच सुरू करू, अशी माहिती पोलिस निरीक्षक अभिजित मोहिते (दक्षिण विभाग) यांनी दिली.

नागरिकांना आवाहन
शहरातील सिग्नल दिवे सुरू करण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाबद्दल आपल्याला काय वाटते. याबाबत सूचना व माहिती लेखी कळवा अथवा समक्ष आणून द्या. सोबत आपले छायाचित्र द्यावे. पत्ता : निवासी संपादक, दै. दिव्य मराठी, भागवत टॉकीज आवार, मुरारजी पेठ, सोलापूर

पोलिस-महापालिका प्रशासनाने हे पाहावे
सिग्नल चौकात तरी किमान दोन पोलिस पॉइंट द्यावेत
सिग्नल चौकातील अतिक्रमण महापालिकेने हटवावे
विद्युत विभागाने बंद सिग्नल दिवे तातडीने सुरू करावेत
नागरिकांनीही सिग्नल चौकात शिस्त पाळावी
वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी हवी
सिग्नल चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे पाहिजेत