आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन्यजीवांच्या अधिवासासह अन्नसाखळी उद्ध्वस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माळढोक अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रातून बेसुमार मुरूम उपसा केल्यामुळे वन्यजीवांची अन्नसाखळीच उद्ध्वस्त झाली आहे. काळवीट, लांडगे, कोल्हे, खोकड या वन्यजीवांना अन्नाच्या शोधात लोकवस्तीत येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मुरुम उपशाकडे दुर्लक्ष करणार्‍यांमुळे परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये कारवाई करण्याची मागणी वन्यजीव अभ्यासकांतून होत आहे.

अन्नसाखळी उद्ध्वस्त

प्रा. लक्ष्मीकांत दामा (प्राणीशास्त्र विभागप्रमुख, दयानंद महाविद्यालय) : मुरूम उपशामुळे त्या जमिनीवर पुढील किमान 10 ते 15 वर्षे गवत उगवण्याची शक्यता नसल्याने तेथील संपूर्ण अन्नसाखळीच उद्ध्वस्त झाली. गवतच नसल्याने कीटक वाढणार नाहीत. त्यांना खाण्यासाठी पक्षी येणार नाहीत. गवत खाण्यासाठी काळवीट, ससे येणार नाहीत. त्यांना खाणारे लांडगे, कोल्हे येणार नाही. अन्न मिळत नसल्याने ते प्राणी लोकवस्तीत जाणार किंवा शेतकर्‍यांच्या पिकांवर तुटून पडणार.

प्रा. डॉ. बलभीम चव्हाण (पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख, सोलापूर विद्यापीठ) : मानवी हस्तक्षेपांमुळे वन्यजीवांचे निसर्गचक्र विस्कळित होते. पर्यावरणाचा ढासळलेल्या समतोलाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

सुजित नरवडे (संशोधक, बीएनएचएस, मुंबई) : याचा फटका वन्यजीवांसह स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांना बसेल. मुरूम उपसा केल्यामुळे पर्यावरणाचा ढासळलेला समतोलाचा अभ्यास करण्यात येईल.