आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्यतृतीयाच्या मुहूर्तावर वाहन, सोने बाजारात जाणवली तेजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेला सोने, वाहन व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात सुमारे 165 कोटींची उलाढाल झाली. त्यात सिंहाचा वाटा अर्थात चारचाकी वाहन क्षेत्राचा राहिला. दुचाकीच्या क्षेत्रात सुमारे सव्वातीन कोटींची उलाढाल झाली. तर सोने बाजाराने अडीच कोटींपर्यंत मजल मारली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची चांगलीच विक्री झाली. या बाजारात सुमारे दहा कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी व्यक्त केला. शहरातील राहणीमान उंचावल्याने चारचाकी वाहनांची खरेदी अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याचे विक्रेत्यांनी नमूद केले. सुमारे 350पेक्षा जास्त चारचाकींची विक्री झाली. तर सुमारे 600 दुचाकींची विक्री झाली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीत गतवर्षापेक्षा सुमारे 20 टक्क्य़ांनी घट झाल्याचे निरीक्षण व्यापार्‍यांनी नोंदवले. एका दिवशी झालेल्या कोटींच्या उलाढालींमुळे सोलापूर शहर श्रीमंत झाल्याची लक्षणे किमान बाजारात तरी दिसत आहेत.

सोने व्यापा-यांची झाली चांदी
सुवर्ण खरेदीच्या मुहूर्तातला अक्षय्यतृतीया अतिशय शुभ. या दिवशी गूंजभर तरी सोने घ्यावेच, अशी सामान्यांची भावना असते. सोन्याच्या उतरत्या दराची त्याला जोड मिळाली आणि सोमवारी सुवर्ण पेढय़ांमध्ये झुंबड उडाली. सुमारे अडीच कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष देवरमनी यांनी व्यक्त केला.

गणेश रामचंद्र आपटे, शिंगवी ज्वेलर्स, करजगीकर ज्वेलर्समध्ये खरेदीची धूम होती. वामन हरि पेठे सन्स आणि पूर्व भागातील सुरेश जनार्दन बिटला या सुवर्ण पेढय़ांमध्येही ग्राहकांची खरेदी सुरू होती.

दोन दिवसांत दोनशे रुपयांनी कमी

शनिवारी 27 हजार 900 रुपये प्रती दहा ग्रॅम सोन्याचा दर होता. रविवारी शंभर रुपयांनी तर सोमवारी आणखी शंभर रुपयांनी कमी झाले. 27 हजार 700 रुपये दराने सोने विकले गेले. मुहूर्त व लग्नसराईने सोने खरेदीत तेजी आल्याचे सराफांनी सांगितले.

अपेक्षित खरेदी
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली; ती मंदच असल्याने अपेक्षित खरेदी होत आहे. रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या आयातीवर अचानकपणे निर्बंध आणल्याने बाजारपेठेत थोडा फार परिणाम झाला.’’
बापूसाहेब करजगीकर, सराफ व्यापारी