आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री देशमुख अन् आयुक्त गुडेवारांत खडाजंगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेचे गाळे सील करण्यावरून पालकमंत्री विजय देशमुख आणि महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यात शनिवारी खडाजंगी पाहायला मिळाली. पालिकेच्या गाळ्यांतील पोटभाडेकरूंवर महापालिका कारवाई करत आहे.
पालकमंत्री देशमुख यांनी आयुक्त गुडेवार यांना मोबाइलवरून कारवाईबाबत विचारणा केली. त्यावर गुडेवार यांनी मनपाचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न असून नियमानुसार कारवाई करत असल्याचे सांगितले. गाळेधारकांची बैठक घेऊन तोडगा काढा. कारवाई करू नका, अन्यथा तुमच्या विरोधात मुंबईत जावे लागेल असा इशारा देशमुख यांनी दिला. या वेळी गुडेवार यांनीही ताठर भूमिका घेतली आणि दोघांत शाब्दिक खडाजंगी झाली.

महापालिकेच्या गाळ्यांमध्ये ३४२ पोटभाडेकरू आहेत. त्यांच्यावर कारवाई करत दुकाने सील करण्याची मोहीम आयुक्त गुडेवार यांनी सुरू केली आहे. त्यापैकी काही पोटभाडेकरूंनी पालकमंत्री देशमुख यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी देशमुख यांनी फोन करून कारवाई थांबवण्यासाठी आग्रह धरला.

आतापर्यंत खटके :एलबीटी वसुलीसाठी व्यापाऱ्यांवर कारवाई करताना, नगरसेवक अविनाश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे आणि नगरसेवक शिवानंद पाटील यांच्या जागेच्या वादातील जागेवरील अतिक्रमण काढल्याप्रकरणी गुडेवार आणि विजय देशमुख यांच्यात खटके उडाले होते.

आयुक्त म्हणाले...
पालिकेचे उत्पन्न वाढवण्याचा मी प्रयत्न करत आहे. मला नियमानुसार कारवाई करावी लागेल. यात माझे वैयक्तिक हित नाही. ते पोटभाडेकरू आहेत. त्यांचा गाळ्यांवर हक्क नाही. मला कायदेशीर कारवाई करावीच लागेल. तुम्हाला जे करायचे ते करा, मलाही इथे कायमचे राहायचे नाही. गाळेधारकांच्या समाधानासाठी मी बैठक घेईन.

पालकमंत्री म्हणाले
पोटभाडेकरूंचे पोट गाळ्यांतील व्यावसायावरच आहे. त्यांना अचानक काढल्यावर त्यांचे नुकसान होईल. त्यांच्याकडून ठरावीक रक्कम घेऊन गाळा द्या. कारवाई करू नका. कारवाई थांबवणार नसाल तर मला मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी लागेल. त्या गाळेधारकांची बैठक घेऊन तोडगा काढा. पालिकेचेही नुकसान होऊ नये.


किंमत घ्या, गाळे द्या
^गाळे जप्त करून त्या गाळ्याची किंमत काढावी आणि त्यांनाच परत गाळे देणे आवश्यक आहे. मनपाचे नुकसान होऊ नये या मताचा मीही आहे. अशा कारवाया करताना आयुक्तांनी शहरातील रस्ते आणि पाण्याकडेही लक्ष द्यावे. विजयकुमारदेशमुख, पालकमंत्री

मूळ गाळेधारक मात्र मोकाटच
गाळ्यांच्या मूळ भाडेकरूंनी लाखो रुपये घेऊन पोट भाडेकरूंना गाळे दिले. पोट भाडेकरूंच्या ताब्यातील गाळे आता महापालिकेकडून सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे पोटभाडेकरूंचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मूळ भाडेकरू लाखो रुपये घेऊन निघून गेले आहेत. या प्रकरणात मूळ गाळेधारक मोकाट सुटले आहेत, तर पोट भाडेकरूंचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मूळ गाळेधारकांवर महापालिकका कोणतीच कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे.
उद्याही होणार कारवाई
गाळेधारकांवर कारवाई करण्याच्या भूमिकेवर महापालिका आयुक्त ठाम असल्याचे दिसले. मोबाइलवरील खडाजंगीनंतर त्यांनी भूमी मालमत्ता विभागाच्या अधीक्षक सारिका आकुलवार यांना फोनवरून नवीपेठ आणि हुतात्मा शाॅपिंग सेंटर येथील गाळ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.