आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मटक्यावर येतोय अंकुश; आनंदली ‘नई जिंदगी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘आमच्या भागातील मटका बंद व्हावा म्हणून पोलिस अधिकार्‍यांना बोलावून कार्यक्रम घेतले. धार्मिक प्रवचनांतून त्याच्या वाईट परिणामांचा संदेश दिला. पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ‘दिव्य मराठी’ने मटकाच्या विरोधात फटके देण्यास सुरुवात केली; अन् आम्ही ‘नई जिंदगी’भागात मटक्यावर अंकुश येत असल्याचे पाहतो आहोत.’ या भावना आहेत, नई जिंदगी भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि मौलाना यांच्या.
नई जिंदगी परिसरात ‘आदर्श समाज’ निर्माणासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. संघटनांची एकत्रित बांधणी केली. त्याच्या माध्यमातून कार्यक्रम सुरू केले. धार्मिक प्रवचने, व्यसनमुक्ती, शैक्षणिक उपक्रम सुरू केले. मटका व्यवसाय बंद होण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांना आणून जाहीर कार्यक्रम घेतले. परंतु त्याला यश आले नाही. उलट काही उपद्व्यापींकडून समजावणीच्या सुरात धमक्या आल्या. त्याला सामोरे जाताना जीव देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे त्यांची तोंडेही बंद झाली. परंतु अवैध व्यवसाय मात्र सुरूच होता. त्यातल्या त्यात मटका. त्याच्या विरोधात ‘दिव्य मराठी’मध्ये बातम्या येण्यास सुरुवात झाली. त्याचा पाठपुरावा सुरू झाला. टपर्‍या उघडल्या की, लगेच फोटो येऊ लागले. पोलिस आयुक्तांची मुलाखत आणि त्यासरशी मटका सुरू असल्याचे पुरावे अंकात प्रसिद्ध झाले. परिणामी मटका बंद झाला. त्याचा असाच पाठपुरावा राहिला तर आम्हाला अभिप्रेत आदर्श समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रांजळ मतं त्यांनी मांडले.
पाठपुराव्यात सातत्य
अँड. महिबूब कोथिंबिरे मटक्याच्या विरोधातील पाठपुरावा वाखाणण्याजोगा आहे. टपर्‍या उघडल्या की त्यावर तुटून पडल्यासारख्या बातम्या सातत्याने आल्या. त्यामुळे हा व्यवसाय पुन्हा सुरू न होण्याची खबरदारीच घेतली गेली. वर्तमानपत्राची ही सामाजिक बांधिलकी समाज सुधारण्यास पोषक आहे.
वडापावची विक्री सुरू
हाफिज हुसेन आमच्या भागात मटका घेणारी व्यक्ती तो पुन्हा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होती. मोबाइलवरून मटका सुरू झाला, परंतु यात अपेक्षित व्यवसाय झाला नाही. शेवटी त्याने मटका घेण्याच्या ठिकाणीच वडापावची विक्री सुरू केली.
वाईट ते वाईटच
मौलाना हारिस वाईट व्यवस्थेविरुद्ध कोणी बोलतच नव्हते. पण मी बोलण्याचे ठरवले. कारण प्रेषितांनी पृथ्वीतलावर पाठवताना प्रत्येकावर एक जबाबदारी सोपवली. त्या भावनेतूनच वाईट गोष्टींच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली. त्याला ‘दिव्य मराठी’ची चांगली साथ मिळाली.
सामाजिक बांधिलकी
विकार अलीम मटका बंद झाल्याने नई जिंदगी भागातील कष्टकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. दबक्या आवाजात को होईना महिला बोलत आहेत. आता ऑनलाइन लॉटरी सुरू आहे. तोही बंद व्हावा, यासाठी प्रयत्न आहेत.
अन् त्याची बोलतीच बंद झाली..
दस्तगीर शेख धार्मिक प्रवचनातून मार्गदर्शन केले. तसे सुरू झाल्यानंतर एका व्यक्तीचा फोन आला. मौलानांना त्यांचे धार्मिक काम करू द्या! नसत्या गोष्टी कशाला शिकवता? त्यावर मी म्हटले, माझ्या अंगावरचे कपडे पांढरे आहेत. ते कफन समजूनच काम करतो आहोत. त्यावर मात्र त्याची बोलती बंद झाली.
रोजगारनिर्मिती नाही त्यामुळेच अवैध धंदे
लहानपणापासूनच हुबळीला ये-जा करतो. आज हुबळीचे रूप पूर्णपणे पालटलेले दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे तिथे रोजगार देणार्‍या कंपन्या आल्या. इन्फोसिसच्या कंपनीत 25 हजार लोक काम करतात. सोलापूरची अशी स्थिती असती तर कदाचित अवैध व्यवसाय एवढे फोफावले नसते. परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी सोलापूरचा औद्योगिक विकास नाही. सामाजिक अंगाने विचार करता, रोजगार देणारे उद्योग येथे येणे आवश्यक वाटते.
समीउल्ला शेख
मठक्याचा शिक्षणावर होतो परिणाम
माझ्या वर्गातील आठवीच्या विद्यार्थ्यावर एकदा रागावलो. त्या वेळी त्याने छाती फुगवून मलाच मोठय़ा आवाजात सांगितले की, ‘मेरा बाप पहिलवान के पास मटका लेता हैं सर.!’ मटक्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही असा परिणाम होतो. ही मुले शाळेत गट वगैरे तयार करतात. स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. वाममार्गाला लागतात. उद्याची पिढी चांगल्या पद्धतीने घडवायची असेल तर समाजातल्या वाईटांना नाकारावेच लागेल. वसीम शेख, शिक्षक