सोलापूर - पाण्याची बचत, शहरातील कचरा सफाई आणि सांडपाण्यावर प्रक्रिया याकडे लक्ष देऊन पर्यावरणात समतोल राखणे गरजेचे आहे. यासाठी कचरा उचलण्यासाठी घंटागाडीचा उपक्रम प्रभावीपद्धतीने राबवणे, पाण्याच्या बचतीसाठी महिला बचत गटांची मदत घेऊन महिलांमध्ये जनजागृती करणे आदी उपक्रम येथे सुरू करणार असल्याचे महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
प्रा. आबुटे युरोपातील तीन देशांचा अभ्यास दौरा करून नुकत्याच परतल्या. त्याविषयी त्यांनी माहिती दिली. इंटरनॅशनल काैन्सिल फॉर लोकल इन्व्हायरमेंटल इनिशिएटिव्हज् (आयसीएलइआय)तर्फे त्यांनी जर्मनी, बेल्जियम आणि स्पेनचा पाच दिवसांचा दौरा केला. ‘आयसीएलइआय’ आंतरराष्ट्रीय संस्था असून जगभरातील शहरांमध्ये पर्यावरण जतन आणि शाश्वत विकासासाठी काम करते. जगभरातील सुमारे १२०० शहरांचे महापौर त्याचे सदस्य असून त्यांच्या वतीने कामकाज पाहिले जाते.
प्रा. आबुटे यांच्यासोबत अप्पर आयुक्त विलास ढगे, उपअभियंता लक्ष्मण चलवादी होते. पाच दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात पाणीपुरवठा, सांडपाण्यावर प्रक्रिया कचरा व्यवस्थापन याची पाहाणी करण्यात आली. स्पेनमधील झारागोसा शहरात पाणीपुरवठा व्यवस्थापन, पाण्याचे दर, पाण्याची बचत याबाबत माहिती तेथील तज्ज्ञांनी दिली. तेथे पाण्याची जनजागृती महिला करतात. तसेच, शाळेत लहान मुलांना धडे दिले जातात. तेथे पूरनियंत्रण होते. नदीच्या पात्रात पाण्याची साठवण केली जाते. त्यामुळे तेथे पूर येत नाही. नदीच्या बाजूस जाॅगिंग ट्रॅक अाहे. नदीत सांडपाणी तेथील कंपन्यांनी सोडल्यास तेथे दंडात्मक कारवाई केले जाते, असेही त्या म्हणाल्या.
पाणी साठवण्यासाठी खाणीचा वापर : जर्मनीच्या शहरात पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, नाल्याचे संवर्धन केले जाते. तेथे पर्यावरणास महत्त्व दिले. तेथे सायकलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. बस स्थानकापर्यंत २० किमीपर्यंत पायी फिरावे लागते. तेथे कोळशाच्या खाणीचा वापर पाण्याच्या साठवणुकीसाठी केला आहे.
शुध्द करुन पुन्हा पाण्याचा वापर
बेल्जियम शहरात सांडपाण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. चार टप्प्यांत पाणी शुद्ध करून पुन्हा वापरले जाते. तेथे जलवाहिनी, ड्रेनेज लाइन फुटत नाही. रस्त्यावर कचरा दिसून येत नाही, प्लास्टिक तेथे फारसे वापरले जात नाही. पाण्याच्या बाटल्या नसतात.
शहर पाणीपुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे
शहरात कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी घंटागाडीतून कचरा उचलण्याचा प्रयत्न करावा लागेल. रस्ता दुभाजकामध्ये झाडे लावून शहराचे सौंदर्य वाढवणे, महिला बचत गटाच्या माध्यमातून पाण्याची बचत करण्यासाठी महिलांमध्ये जनजागृती करणे, शहरातील बंद पडलेल्या विंधन विहिरी दुरुस्त केल्यास पाण्याची बचत होईल. शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.” प्रा.सुशीला आबुटे, महापौर