आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुसत्या जागा वाटपाने जबाबदारी संपते का? ‘एमआयडीसी’ अधिकाऱ्यांना उद्योजकांचा प्रश्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे काम केवळ जागा वाटप करणे एवढेच नाही. संबंधित जागांवर उद्योग उभारणी झाली का? त्यांना पुरेशा सुविधा आहेत का? त्यांच्या अडचणी काय आहेत? या बाबींची तपासणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. ते होत नसल्यानेच औद्योगिक वसाहतींमध्ये खुले भूखंड मोठ्या प्रमाणात दिसून येतात. गरजवंताला मात्र जागा मिळू शकत नाही. अशाने उद्योगवाढ कशी होईल, असा प्रश्न येथील उद्योजकांनी उपस्थित केला आहे.
चिंचोळी एमआयडीसीत ४८७ सदस्यांनी जागा घेतली. परंतु ते विकसित केले नाही. त्यामुळे ७०० एकर जमीन पडून असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी मुकुंद बिबवे यांनी म्हटले आहे. दिलेल्या मुदतीत ही जागा विकसित केली नाही तर ती परत घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. २०१२ मध्ये या जागांचे वाटप झाले. त्यानंतरच्या वर्षांत जागा विकसित करण्याची मुदत असते. या कालावधीमध्ये काही बाबींची पूर्तता करावयाची असते. जसे इमारतीचा नकाशा (प्लॅन) सादर करणे, त्याला मंजुरी मिळवणे, इमारत बांधल्याचे प्रमाणपत्र मिळवणे, त्यानंतर उत्पादन करणे. या गोष्टींची तपासणी का होत नाही? त्यासाठी पूर्ण कालावधीची वाट पाहायची असते काय? असेही उद्योजक म्हणाले.

वेळोवेळी तपासावे

एमआयडीसीकडून जागा वाटप झाल्यानंतर त्याची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असते. दिलेल्या मुदतीत करावयाची कामे होत आहेत का, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. तसे होत नाही म्हणून तर औद्योगिक वसाहतींमध्ये खुले भूखंड मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. गरजू उद्योजकाला मात्र जागा मिळत नाही. हरीगोडबोले, अध्यक्ष, सोलापूर लघुउद्योग असो.

‘अभय योजना’ लवकरच

जागा घेऊन विकसित करणाऱ्यांसाठी राज्याच्या उद्योग मंत्रालयाने ‘अभय योजना’ देण्याचे ठरवले आहे. विकसित करण्याची मुदत संपली किंवा शेवटच्या टप्प्यात असणाऱ्यांना किमान वर्षभराची मुदत या योजनेनुसार मिळेल. या कालावधीत उद्योग उभारणी झाली नाही तर त्यांची जागा विनाअट काढून घेण्यात येईल. त्याच्या विरोधात कुठेही अपील करता येणार नाही. ही योजना लवकरच येईल, असे एमआयडीसीच्या सूत्रांनी सांगितले.

मुदतीनंतर परत घ्या

दिलेल्या मुदतीत जागा विकसित होत नसल्यास जागा परत घ्याव्यात, असे अनेकवेळा अधिकाऱ्यांना सांगितले. परंतु उपयोग नाही. पडून असलेल्या जमिनीचे वाटप गरजवंतांना केल्यास उद्योगवाढीस लागेल. गणेशसुत्रावे, सचिव, नॉर्थ सोलापूर इंडस्ट्रियल असो