आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार दिलीप मानेंच्या झुंडशाहीविरोधात व्यापार्‍यांची बंदची हाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आपल्या मुलाबरोबर झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरून आमदार दिलीप माने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी 10 च्या सुमाराला नवी पेठेतील एका व्यापार्‍यासह त्याच्या दोन मुलांना बेदम मारहाण केली. एवढ्यावर हा प्रकार थांबला नाही. आमदार माने यांनी शिवीगाळ केली. हातात रॉड घेऊन कार्यकर्त्यांच्या मदतीने दुकानाची तोडफोड केली. यात व्यापार्‍यासह दोन मुले जखमी झाली. या मुलांनी केलेल्या झटापटीत आमदार माने यांच्या तोंडाला आणि हाताला दुखापत झाली.
व्यापार्‍यांनी या प्रकरणी एकजूट दाखवत सोमवारी दुपारनंतर बंदची हाक दिली. नवीपेठसह सोलापूरातील व्यापार दुपारनंतर बंद राहाणार असल्याचे व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे.


या प्रकरणी परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आमदार माने यांचा शनिवारी वाढदिवस होता. त्याचा गाजावाजाही करण्यात आला. रविवारी दिवसभर त्याच्या हाणामारीचे प्रकरण चर्चेत राहिले.
जालिंदर मग्रुमखाने (वय 62), रवी जालिंदर मग्रुमखाने (वय 26), भारत जालिंदर मग्रुमखाने (वय 33), आमदार माने (वय 55) हे जखमी झाले आहेत. मग्रुमखाने यांच्यावर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार झाले. माने यांच्यावर मुळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मुलाने वडिलांना... वडिलांनी कार्यकर्त्यांनाही बोलावले
यादरम्यान, आमदार माने हे नवीपेठ परिसराकडे येत होते. मुलाचा फोन आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना माहिती दिली. घटनास्थळी आल्यानंतर आमदार माने यांनी मग्रुमखाने आणि त्याच्या मुलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हातात रॉड घेऊन दुकानाची मोडतोड केली. यावेळी नगरसेवक जयकुमार माने, नागेश ताकमोगे यांच्यासह पंचवीस-तीस कार्यकर्ते आले. कार्यकर्त्यांनी दोन्ही दुकानांवर दगडफेक केली. याच झटापटीत मानेंच्या उजव्या हातावर रॉडचा वार बसला. हनुवटीला ठोसा तर डाव्या हातावर काठी बसल्यामुळे हाताला मार लागला. सुरुवातीला त्यांना सिध्देश्वर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथून परत मुळे हॉस्पिटलमध्ये हलवले. मग्रुमखाने यांच्या दंडालाही गंभीर जखम झाली आहे.

पोलिसांचा ताफा आणि व्यापार्‍यांची गर्दी

सण, उत्सवाचे दिवस आणि रविवारमुळे दुकाने लवकरच उघडण्यात येत होती. त्याचवेळी हा प्रकार घडल्यामुळे व्यापार्‍यांत पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले. काहीनी दुकाने अर्धवट बंद केली. पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे आणि सहकार्‍यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

मुळे हॉस्पिटलमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी
घटनेचे वृत्त समजताच माने यांचे दक्षिण, उत्तर व सोलापुरातील कार्यकर्ते रुग्णालयात जमा झाले. राजकीय नेते, नगरसेवक, नातेवाईक, कुमठे गावातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी हटविण्यासाठी दुपारी सव्वाएकच्या सुमाराला माने यांना रूममधून बाहेर आणले. तब्येत ठीक आहे. सर्वांनी घरी जावे, असे आवाहन केले.

पोलिसी खाक्या दाखविण्याची गरज
मागील महिन्यात बुध्दगया येथील घटनेवरून चौघा तरुणांनी गोंधळ घालत दुकानावर दगडफेक केली होती. त्या घटनेतील आरोपींना अद्याप अटक नाही. आज पुन्हा ही घटना घडली. यावरून फौजदार चावडी पोलिसांचे काम उठावदार होत नसल्याचे दिसते. पोलिसी खाक्या दाखवत व्यापार्‍यांना संरक्षण देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यापार्‍यांनी दिली. व्यापार्‍यांमध्ये सुरक्षिततेची भावना नाही. हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. दुचाकी वाहने बिनधास्तपणे फिरतात. एकेरी मार्गाचा अवलंब होत नाही.

आमदार मानेंची झुंडशाही
आमदार माने हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी भांडण करण्यापेक्षा सोडविले असते आणि दोघांची बाजू ऐकून घेऊन कायदेशीरबाबींचा आधार घेतला असता तर एवढा मोठा प्रकार घडला नसता. या झुंडशाहीबद्दल नागरिक, व्यापारर्‍यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातही माने मागील काही महिन्यांपूर्वी पोलिसांच्या अंगावर मारण्यासाठी ते धावून गेले होते.

छायाचित्र - जखमी मग्रुमखाने बांधव.