आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Mla In Winter Session Of Legislative Assembly Maharashtra

रखडलेल्या प्रश्नांनाच उजाळा द्यावा लागतोय आमदारांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले केटरिंग कॉलेज, महादेव कोळी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले, यंत्रमाग कामगारांच्या सवलती, ओबीसी सवलती, सोलापूरचे शासकीय रुग्णालय, विमानसेवा अशा अनेक प्रश्नांवर शहर व जिल्ह्यातील आमदारांनी नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले आहेत.


केटरिंग कॉलेज सुरू करण्यात यावे
सोलापूर येथील केटरिंग कॉलेज सुरू करण्यात यावे, उसाला ठिबकसाठी 75 टक्के अनुदान देण्यात यावे, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतील अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यावीत, माळशिरस तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी निधी मिळावा, अकलूज-माळशिरस या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे, दोन्ही संतांच्या पालखीमार्गाचे चौपदरीकरण व्हावे, अरण येथील सावता माळी देवस्थानला ब दर्जा मिळावा, करमाळा तालुक्यातील कुकडी डाव्या कालव्याच्या अपूर्ण कामांना निधी उपलब्ध व्हावा, मोहोळ येथे बांधलेला पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, आवाटी (ता. करमाळा) येथील चाँद पाशा दर्गाहच्या विकासासाठी निधी मिळावा, पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात यावीत. - विजयसिंह मोहिते (विधान परिषद)

राज्याचेही प्रश्न मांडले
राज्यातील आरोग्य सेवेत सुव्यवस्था येण्यासाठी 1257 नवीन शासकीय रुग्णालये सुरू करावीत, राज्यातील 100 जलदगती न्यायालयांत महिलांवरील अत्याचारांचे 45 हजार 170 खटले प्रलंबित आहेत. त्यावर तातडीने निकाल द्यावेत व ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग देवस्थानासाठी विकास निधी मिळावा.


अनुसूचित जमातीचे दाखले सहज मिळावेत
आमदार गणपतराव देशमुख हे अनुभवी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी याआधीही विधानसभेत तालुक्यातील विविध प्रश्न मांडले आहेत. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी पुढील प्रश्न उपस्थित केले आहेत. महादेव कोळी समाज व तत्सम अनुसूचित जमातीच्या नागरिकांना 18 मे 2013 चे परिपत्रक रद्द करून जातीचे दाखले सहज मिळावेत. आदिवासी समाजाला जात प्रमाणपत्र देताना नाहक लावल्या जाणार्‍या अटी रद्द कराव्यात. उच्च माध्यमिक विद्यालयात 100 टक्के अनुदान मिळावे, विना वेतन प्राध्यापकांना वेतन मिळावे. टेंभू व म्हैसाळ योजनांना पुरेसा निधी मिळावा. 5 वी ते 10 वी तुकड्यांना अनुदान मिळावे. वाढलेले वीजदर कमी करणे आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्षवेधी, तारांकित प्रश्नांत आवाज उठवणार आहे. - गणपतराव देशमुख (सांगोला)

कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यावर भर
राज्यातील कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यांचे प्रश्न सोडवण्याचे वर्षानुवर्षांपासून शासन आश्वासन देत आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून तालुक्यातील दुष्काळ हटत नाही. शाश्वत पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जावा यासाठी सभागृहात आवाज उठवणार.

एकरुख योजनेच्या निधीसाठी प्रयत्न
एकरूख उपसा सिंचन योजनेसाठी 38 कोटी रुपये निधी खर्चास तातडीने मान्यता मिळावी, दक्षिण सोलापूर येथे बोरामणी-मुस्ती येथे औद्योगिक वसाहत करावी, अक्कलकोट शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या 100 बेडला मंजुरी व शासकीय निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, सोलापूर ते अक्कलकोट रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा, जिल्हा परिषदेच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील शेतकर्‍यांना बी-बियाणे व खत वाटप झाले नाही, त्यांची कारणे कळावीत, तालुक्यातील केंद्रीय रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर असून निधी दिला जात नाही, त्याची माहिती मिळावी, तालुक्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या दहाव्या टप्प्यातील निधी मिळालाच नाही, निधी न मिळण्याचे कारण काय आहेत, मुख्यमंत्री निधीतून टंचाईग्रस्त गावांमध्ये लघु पाटबंधारे व सिमेंट बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करावा. - सिद्रामप्पा पाटील (अक्कलकोट)

तालुक्यातील रस्ते, आरोग्याकडे लक्षवेधी
अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य सुविधा आणि रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. आमदार पाटील यांनी नागपूर विधानसभेत त्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्याला अधिकाधिक विकासनिधी खेचून आणण्यासाठी सभागृहाचे लक्ष वेधणार आहे.

एलबीटीचा प्रश्न सभागृहात मांडू
शहरातील व्यापार्‍यांच्या दृष्टीने एलबीटीचा प्रश्न गंभीर वळणावर आला आहे. यासाठी शासनाचे लक्ष वेधणार आहे. प्राथमिक शाळांतील तुकड्यांना मान्यता, सूक्ष्म सिंचनमध्ये 15 कोटींचा घोटाळा, अपंगाचे प्रमाणपत्र, शासकीय रुग्णालयातील हाल, नगर अभियंता सुभाष सावस्कर यांचे निलंबन आणि दाखल झालेली फिर्याद, मनपा शाळेतील शिक्षकांचे निलंबन, अपघातातील विद्यार्थ्यांना विमा अनुदान, कारागृहातील कैदीचे पलायन, जिल्हा परिषदेतील ट्री गार्डचा वापर, मार्कंडेय गृह निर्माण सोसायटीचे आठ एकर भूखंड, जीव्हीएस कंपनीकडून मुरूम उपसा प्रकरणी 16 कोटी दंड, सेतूमधील दाखले, सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रातील तुरटी वापर, शहरातील ड्रेनेज मक्ता, शरद आटकळे मृत्यू प्रकरण, यशराज बकुर मृत्यू प्रकरण असे 65 प्रश्न आपण विधानसभागृहाकडे पाठविले आहेत. - विजयकुमार देशमुख (सोलापूर शहर उत्तर)

विद्यार्थ्यांच्या थकित शिष्यवृत्तीकडे लक्ष
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांना साहित्य वाटताना ते निकृष्ट दर्जाचे वाटण्यात आले. त्यामध्ये मोठा घोटाळा झाला. त्याचबरोबर मुळेगाव तांडा येथे सोनांकुर एक्स्पोर्ट कंपनीने सरपंच व ग्रामसेवकाचे बनावट दाखले तयार करून फसवणूक केली. जिल्ह्यात तंटामुक्त गावांना पुरस्कार वाटताना पुरस्कारांच्या रकमेत घोटाळा झाला. पंढरपूर येथील दलित महिलेवर घरमालकाने केलेला अत्याचार, जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 24 कोटी 34 लाखांची शिष्यवृत्ती थकीत आहे. पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते टाळाटाळ करीत आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. ज्याठिकाणी आहेत तिथे दुरवस्था आहे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बोगस 21 शिक्षकांना पदोन्नती दिली, सोलापूरच्या टोल नाक्यांवर पावती न देता टोल वसूल केला जातो, जिल्ह्यासाठी गत दोन वर्षांत दुष्काळासाठी 89 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी केवळ 20 कोटींचा निधी वापरण्यात आला. मांडवे (ता. माळशिरस) येथे विजेच्या तारांना चिकटून बालकाचा मृत्यू झाल्याचा प्रश्नही आहे. - हनुमंत डोळस (माळशिरस):