आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Commissioner Gudewar And Kothe Contro

आयुक्तांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; गुडेवार म्हणतात, 18 महिन्यांत ड्रेनेजचे काम होईल पूर्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - 212 कोटी रुपयांच्या ड्रेनेज कामाचा मक्ता रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मंगळवारी घेतला. त्यामुळे काही सत्ताधार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कसेही करून आयुक्तांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे बुधवारी दिसून आले. दरम्यान, आयुक्तांच्या बदलीसाठी गोपनीय बैठक झाल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजले. आयुक्तांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांकडे राजीनामा देऊ असा पवित्रा महेश कोठे यांनी घेतला. त्यास काही नगरसेवकांनी विरोध केला.

सत्ताधारी मक्तेदाराच्या बाजूने: विरोधकांचा आरोप
18 महिन्यांत काम
ड्रेनेजचा मक्ता रद्द केला असला तरी नव्याने अल्पमुदतीत टेंडर काढण्यात येईल. काम थांबणार नाही. फक्त 18 महिन्यात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. काम सुरू करण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागेल. कामाची माहिती घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल, असे आयुक्त गुडेवार यांनी सांगितले.
समान निधी वाटपावरून वाद
सर्व नगरसेवकांना 20 लाख रुपये विकास निधी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त गुडेवार यांनी घेतला पण त्यावरून सत्ताधारी नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे.
दंडातून रस्ते करा
ड्रेनेजच्या मक्तेदारांकडून 15 कोटी रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. मक्तेदाराकडून ड्रेनेजचे खड्डे खोदले गेले पण ते तसेच ठेवले. 15 कोटीतून ड्रेनेजसाठी खोदलेल्या ठिकाणचे रस्ते ठीक करा, अशी मागणी नगरसेवक जयकुमार माने आणि नागेश ताकमोगे यांनी आयुक्त गुडेवार यांच्याकडे केली.
आयुक्त नियमानुसार काम करत असताना, त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसून येतो. हा दबावतंत्रच म्हणावे लागेल. सत्ताधारी हे लोकहिताऐवजी मक्तेदाराच्या बाजूने बोलतात असे दिसते.’’
प्रा. अशोक निंबर्गी, विरोधीपक्ष नगरसेवक
मक्तेदारासोबत चर्चा करण्यासाठी महापौरांसह आम्हाला बोलवून चर्चा केली. मक्ता रद्दच करायचा होता तर आम्हाला बोलावले कशासाठी? आम्ही काम करण्यास अडवत नाही. आयुक्तांनी सामंजस्याची भूमिका ठेवावी.’’ महेश कोठे, सभागृह नेता, मनपा
बंद खोलीत तासभर वादळी चर्चा
मक्ता रद्द केल्याला आमचा विरोध नाही पण ड्रेनेजची कामे होणे आवश्यक आहे. रस्ते खराब झाले आहेत, ती चांगली व्हावीत. आम्ही आयुक्तांवर दबाव टाकत नाही तर त्यांना सहकार्य करत आहोत.’’ अलका राठोड, महापौर
ड्रेनेजचा मक्ता रद्द केल्याचे पडसाद महापौर कार्यालयात उमटले. महापौरांच्या निजी कक्षात बुधवारी सायंकाळी तासभर या विषयी वादळी चर्चा झाली. महापौर अलका राठोड, महापालिकेतील सभागृह नेते महेश कोठे, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपमहापौर हारून सय्यद, स्थायी समिती सभापती इब्राहिम कुरेशी, नगरसेवक दिलीप कोल्हे, चेतन नरोटे उपस्थित होते.
कोठे यांचा प्रश्न
मक्ता रद्द करण्याचा निर्णय घेताना आयुक्तांनी आम्हाला माहिती देणे आवश्यक होते. आजवर टेंडर रद्द करण्यापूर्वी विषय सभागृहापुढे येत असत.याचवेळी असे का झाले नाही, असा प्रश्न सभागृह नेते महेश कोठे यांनी दिव्य मराठीकडे उपस्थित केला.
आयुक्तांचे उत्तर
आयुक्त गुडेवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना नियमानुसारच काम केल्याचे सांगितले. कोणत्या नियमाने सभागृहाकडे मक्ता रद्द करण्याचा विषय पाठवायचा तो नियम सांगा, अशी भूमिका आयुक्तांनी पदाधिकार्‍यांसमोर घेतल्याने त्यांची बोलती बंद झाली.