आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: प्रशासकीय अंदाजपत्रकात करवाढ नाही, 4.22 लाख रुपये शिल्लक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गेल्यावर्षी महापालिका आयुक्तांनी 480 कोटी 96 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. डिसेंबरअखेर सुधारित बजेटनुसार 412.19 कोटी वसूल होणे अपेक्षित असताना फक्त 288.57 कोटी वसुली झाली. 123.61 कोटी रुपयांची तूट असताना 2013-14 चे 720.06 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी स्थायी समितीकडे मंगळवारी सादर केले. यात कोणतीही कर आणि दरवाढ नाही. मनपाकडे 4.22 लाख रुपये नाममात्र आरंभीचे शिल्लक असताना बजेट फुगवून 720 कोटींपर्यंत नेण्यात आले आहे.
यामध्ये 354.93 कोटी महसूल आणि 365.13 भांडवली विभागाचा समावेश आहे. उत्पन्नामध्ये सर्वाधिक 160 कोटी एलबीटीच्या माध्यमातून मिळणार आहेत, तर 33.93 टक्के रक्कम कर्मचाºयांच्या वेतनावर खर्च होणार आहे. उत्पन्नवाढीची कोणतीही योजना आणि नागरिकासाठी खास बाब आयुक्तांच्या अंदाजपत्रकात नाही. स्थायी आणि सभागृहात गेल्यानंतर अंदाजपत्रक एक हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
आयुक्त सावरीकर यांनी मंगळवारी सकाळी स्थायी समितीचे सभापती कोंड्याल यांच्याकडे हे अंदाजपत्रक सादर केले. उपायुक्त पी. वाय. बिराजदार, मुख्य लेखापाल सुकेश गोडगे, नगरसचिव ए. ए. पठाण, नगरसेवक पद्माकर काळे, बाबा मिस्त्री, किशोर माडे, मेघनाथ येमूल, बिसमिल्ला शिकलगार आदी उपस्थित होते.

महसुलीत 87 कोटींची वाढ
डिसेंबर 2011 आणि 2012 मधील तफावत पाहता मनपाच्या एकूण वसुलीत 87 कोटींनी वाढ झाली आहे. डिसेंबर 2011 मध्ये 69.70 कोटी होती, ती 2013 पर्यंत 156 कोटींपर्यंत पोहोचली. अंदाजपत्रकात कोणतीही दरवाढ नाही, पण काही शुल्कांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे उत्पन्नात चार कोटी रुपयांची भर पडेल. बजेट फुगीर नसून, एलबीटीतून 160 कोटी उत्पन्न अपेक्षित असल्याने ते फुगल्यासारखे वाटते.’’
- अजय सावरीकर, आयुक्त, मनपा

सभागृहात सुधारणा करू
आयुक्त सावरीकर यांनी 720 कोटी रुपयांचे बजेट सादर केले असून, त्यात पुन्हा वाढ होऊन ते एक हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल. आयुक्तांनी बजेट फुगवले असेल तर ते सभागृहात आल्यानंतर त्यात सुधारणा करण्यात येईल. ’’
-महेश कोठे, सभागृह नेता, मनपा

अंदाजपत्रकातील ठळक वैशिष्ट्ये
>महापालिकेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी तीन कोटींची तरतूद
>72 कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर
>232 कोटींची मलनिस्सारण योजना प्रगतिपथावर
>सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात फिल्टर प्लँट बसवणे, त्यामुळे 4 ते 5 एमएलडी पाण्याची बचत
>नळांना मीटर बसवणे आणि पाण्याचे लेखापरीक्षण करणे
>नगरोत्थान योजनेतून 187 कोटींचे रस्ते
>रस्त्यांची सुधारणा, पार्किंगची सोय
>मनपा शाळा इमारतींचे बीओटीवर बांधकाम
>नागरी सुविधा
>महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयासाठी तीन कोटी
>123 कोटींची चालू वर्षी तूट
>प्रसूतिगृहांत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देणे

अंदाजपत्रक चुकीचे
"मागील वर्षाच्या अंदाजपत्रकात 123 कोटी रुपयांची तूट असताना आरंभीची शिल्लक चार लाख रुपये कशी? त्यामुळे आयुक्त सावरीकर यांनी सादर केलेले अंदाजपत्रक चुकीचे आहे. शासकीय अनुदान 365 कोटी रुपये असेल तर 720 कोटीचा अंदाज बरोबर आहे. करवाढ व दरवाढ नसेल तर ते सविस्तर पाहून आम्ही सभागृहात बाजू मांडू.’’
-सुरेश पाटील, नगरसेवक, भाजप