आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदरात पाडून घेण्यासाठी ‘पदर खोचावा’ लागेल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘महिलाराज’ असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीने सूचना व शिफारशींसह अंतिम मान्यतेसाठी मनपा सभागृहाकडे पाठविलेले 2013-2014 वर्षासाठीचे अंदाजपत्रक कदाचित महिलाकेंद्री नसले तरी महिलांना पुढे घेऊन जाण्याचा सुप्त मानस व्यक्त करणारे आहे. सभागृहातील महिला नगरसेविकांनी पदर खोचला तर महापालिकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षासाठीचे हे अंदाजपत्रक महिलाकेंद्री होऊ शकते. त्यासाठी गरज आहे प्रबळ इच्छाशक्तीची.

महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा 30 आणि 31 मार्च रोजी होणार आहे. मंजुरीसाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या बैठका झडल्या. स्थायी समितीने सूचना व शिफारशींमध्ये महिला व मुलींचे आरोग्य, रोजगार, शिक्षण व लिंगसमभाव अशा अंगांनी काही सूचना व शिफारशी केल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार महिला व बालकल्याण समिती व आंबेडकर आवास योजनांसाठी महसुली बजेटच्या 5 टक्के व अपंग सहाय्य केंद्रांसाठी 3 टक्के रक्कम सुचवली आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून निर्धारित केलेली रक्कम खर्चासाठी योग्य वेळी उपलब्ध करून दिली जात नसल्याचाही अनुभव आहे. शिवाय सुचविलेल्या शिफारशीही काहीशा अपुर्‍या प्रमाणातील आहेत.

पदाधिकार्‍यांसाठी कोटा पद्धतीमुळे महिला महापौर व महिला विरोधी पक्षनेत्यांना आपापल्या वॉर्डातील विकासकामे करण्यासाठी असलेल्या तांत्रिक अडचणी कमी होऊ शकतात. पण, इतर नगरसेविकांना त्यांच्या वॉर्डातील विकासकामे करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचा अधिकार कदाचित महिलेला असतो. परंतु, बजेटमध्येच तशी तरतूद केलेली नसेल तर हवे ते काम हाती घेण्यासाठी नियमांच्या अडथळ्यांची शर्यत करावी लागते.

सोलापुरात संघटित महिला शक्ती
शहरातील सुमारे 25 टक्क्यांहून अधिक कुटुंबांची उपजीविका केवळ महिलांच्या र्शमावर अवलंबून आहे. अर्थात कुटुंबातील पु्रुषवर्गाच्या हाती कामाचा अभाव असू शकतो. दुसर्‍या बाजूने उपजीविकेसाठी दररोज आठ तास र्शम करणार्‍या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी किमान दोन तास खर्च करावे लागतात, हे वास्तव आहे. दिल्लीतील ‘निर्भया’नंतर देशभर मुली व महिलांच्या समताधिष्ठित हक्क व अधिकार, कायद्याची चर्चा सुरू झाली आहे. स्वत:च्या हक्कासाठी महिलांमध्ये संघटितपणाची जाणीव वाढते आहे. त्या तुलनेत महिलांच्या संघटित कृतिशील कार्यकर्त्यांची सर्वाधिक संख्या सोलापुरात आहे. अशा स्थितीत मनपाला ‘महिलाकेंद्री’ बजेटमध्ये अडचण येईल असे नाही. पश्चिम महाराष्ट्रातील शहरी भागातून विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधीही शहराने एका महिलेला दिलेली आहे.

सुविधा देता येतील
0 मुलींसाठी संगणक प्रयोगशाळा
0 मनपा प्रसूतिगहांमध्ये सवलतीत परिचारिका अभ्यासक्रम
0 फोन करताच महिलांसाठी ‘अँॅम्ब्युलन्स’ची उपलब्धतता
0 नेहरू सायन्स सेंटरमध्ये मुलींना मोफत प्रवेश
0 सर्व बगीचे व प्राणी संग्रहालयांत शाळकरी मुलींना मोफत प्रवेश
0 मनपांच्या शाळांमधील मुलींना जलतरण तलावात मोफत प्रवेश
0 मनपाच्या नव्या मिनी गाळ्यांमध्ये महिलांसाठी राखीव गाळे
0 महिला-तरुणींना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
0 घरकुलातून ये-जा करणार्‍या र्शमिक महिलांना प्रवास सवलत
0 महिलांच्या नागरी प्रश्नांसाठी ‘हेल्पलाइन’