आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका अंदाजपत्रक: पैसा जाणार असा, पण प्रत्यक्षात येणार कसा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात पैसा कसा जाणार हे सांगितले असले तरी, पैसा कोठून येणार याचा खुलासा झालेला नाही. तसेच उत्पन्नांची नवी साधने सुचवण्यात आलेली नाहीत. 720 कोटींचे अंदाजपत्रक दिसत असले तरी, ते फुगलेले आहे. कारण, यात निम्म्यापेक्षा जास्त भाग हा सरकारी अनुदानाचा आहे.

महापालिकेचे 2013-14चे 720 कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त अजय सावरीकर यांनी सादर केले. हा आकडा फुगीर वाटत असून मुख्य अंदाजपत्रक मात्र 354 कोटी 93 लाखांचेच आहे. तर, राज्य सरकारकडून मिळणारी अनुदानाची रक्कम त्यापेक्षा जास्त आहे. ती 365 कोटी आहे. उत्पन्नात भर कशी घालणार याचा अंदाजपत्रकात कोठेच उल्लेख नाही. आगामी वर्षातील शहर विकासाची वाटचालीची दिशा स्पष्ट होत नाही. 2013 मध्ये शहरावर रस्ते व ड्रेनेजच्या माध्यमातून कर्जाचा बोजा पडणार. वाढते कर्जाचे बोजे कसे पेलणार, हेही स्पष्ट झालेले नाही.

अंदाजपत्रक सादर केले असले तरी त्यात पदाधिकारी पुन्हा वाढ करतील यात शंका नाही. प्रशासनाने सादर केलेले बजेटनुसार कामकाज चालत नाही. हेच चालू वसुलीवरून दिसून येते. 720 कोटींचे बजेट असले तरी त्याच्या जवळपासही पालिका पोहोचत नाही, अशी टीका सभागृह नेते महेश कोठे यांनी केली.

आकडा फुगवलेला
महापालिका सभागृहात अंदाजपत्रक मांडतील त्यावेळी तो तसा राहणार नाही. अंदाजपत्रक करण्यापूर्वी पदाधिकार्‍यांनी तज्ज्ञाशी चर्चा केली पाहिजे. शहर डोळ्यासमोर ठेवून बदल केले पाहिजेत. 720 कोटींचा आकडा शासकीय अनुदानानुसार फुगला. स्वत:च्या पायावर उभी राहणारी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे.’’
-प्रा. पुरणचंद्र पुंजाल, माजी नगरसेवक

याकडे दुर्लक्ष
महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि कर आकारणीची वसुली होत नाही. उद्दिष्टापर्यंत प्रशासन पोहोचत नाही. बेकायदा बांधकाम नियमित करणे, बेवारस मिळकती शोधून मालकाकडून कर वसुली करणे, मनपा जागेचे भाडे वाढवणे, बोगस नळ शोधून त्यापोटी दंडात्मक कारवाई करणे याकडे दुर्लक्ष आहे. हद्दवाढ आणि शहरातील लाखांच्या पुढील थकबाकीदारांची नावे जाहीर झाली. पण, वसुलीसाठी त्यांच्याकडे गेलेच नाहीत.

वसुली नाही
चालू वर्षासाठी आयुक्तांनी 480 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. पण, त्यानुसार कामकाज झाले नाही. एलबीटीला व्यापार्‍यांचा विरोध पुढे करत इतर वसुलीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे 123 कोटींची तूट आली.

मॉडेल प्रोजेक्ट कुठेच नाही
सोलापूर महापालिका शहरात नवीन काय करणार आहे, याबाबत काहीच सुचवले नाही. बीओटी प्रकल्प, युवकासाठी अत्याधुनिक सुविधा, मॉडेल रुग्णालय, नवीन प्रणालीचे रस्ते, पाण्याचे नियोजन, महिलासाठी प्रसाधनगृह आदी मॉडेल प्रोजेक्ट अंदाजपत्रकात दिसून येत नाही. मागील वर्षाच्या अंदाजपत्रकात सुमारे पस्तीस सूचना व शिफारसी होत्या.

अनेक त्रुटी आहेत
अंदाजपत्रकात अनेक त्रुटी दिसून येतात. अंदाजपत्रकात सुचवल्याप्रमाणे कामे होत नाहीत. नगरसेवकांची कामे होत नाहीत. त्यामुळे त्यांचा अंदाज हा अंदाजच राहण्याची शक्यता आहे. अन्य उत्पन्नाचे 100 कोटी रुपये येतील त्यानुसार नियोजन केले पाहिजे. या सर्व बाबींचा ऊहापोह सभागृहात करणार आहे.
-अँड. यू. एन. बेरिया, नगरसेवक