आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सर्वात शेवटी सोलापूर; सत्ताधारी नगरसेवकांची महापौरांकडे मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- राज्यातील सर्वच्या सर्व महापालिकांचे बजेट 25 मार्चच्या आधी मंजूर होते. सोलापूरपेक्षा पाच पटीने मोठे बजेट असणारी पुणे महापालिकाही याला अपवाद नाही. सोलापूर महापालिकेत मात्र 31 मार्चला, राज्यात सर्वात शेवटी बजेट सादर करण्याची प्रथा पडली आहे. त्यामुळे नगरसेवकांना सविस्तर आणि मुद्याला धरून चर्चा करता येत नाही. परिणामी घाईगडबडीत बजेट मंजूर केले जाते. या प्रकाराला सत्ताधारी पक्षातीलच 23 नगरसेवकांनी विरोध केला आहे. बजेटसभा लवकर घ्यावी, अशी मागणी त्यांनी महापौर अलका राठोड यांच्याकडे केली.

सविस्तर चर्चा होत नाही
31 मार्च रोजी महापालिका सभा 11 वाजता बोलावण्यात येते आणि ती सुरू होते 12 वाजता. त्यानंतर मुद्दामहून लक्षवेधी देत त्यात वेळ घालवला जातो. त्यामुळे बजेटवर प्रत्यक्ष चर्चा सुरू होते ती दुपारी दोन वाजता. त्यात पुन्हा पाइंट ऑफ ऑर्डर, पॉइंट ऑफ इन्फर्मेशन असे मुद्दे काढून त्यावर टाईमपास केला जातो. विषयांतर होत असताना महापौर आणि सभागृह नेते चर्चाबंदी आणत नाहीत. त्यामुळे बजेटवर सविस्तर चर्चा होत नाही. सभा दीर्घकाळ चालत असल्याने नगरसेवकांमध्ये गांभीर्य नसते.

ठरावीक व्यक्तीभोवती फिरतो महापालिकेचा कारभार

"बजेटमध्ये ज्या रकमा तरतूद करून ठेवल्या जातात त्या नंतर सोयीनुसार वर्ग केल्या जातात. मागील वर्षाच्या जमा-खर्चावर फारशी चर्चा होत नाही. मी स्थायी समिती सभापती असताना बजेट मांडला होता. तो उत्तम बजेट असल्याचे माजी नगरसेवक रामभाऊ गणाचार्य यांनी संबोधले होते. आता मात्र परिवहन आणि शिक्षण मंडळावर चर्चा होणे अपेक्षित असताना तसे होत नाही. महापालिकेचा कारभार ठराविक व्यक्तींभोवती फिरत असल्याचे दिसून येते. रस्ते, पाणी, ड्रेनेज सारख्या महत्त्वाच्या बाबीकडे अंदाजपत्रकात दुर्लक्ष करण्यात येत आहे. महापालिकेच्या कारभारात गोंधळ आहे. शासन निधी देतो पण त्याचा वापर योग्य ठिकाणी होत नाही. बीपीएमसी अँक्ट नुसार कारभार चालतो की नाही याबाबत शंका आहे.’’
-तम्मा गंभीरे, माजी स्थायी समिती सभापती

मालेगाव मनपात अभ्यासासाठी तीन दिवस
"मालेगाव महापालिका सभागृहात 20 मार्च रोजी बजेट सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर तीन दिवसासाठी सभा तहकूब करण्यात येते. त्या काळात नगरसेवक अभ्यास करतात. त्यानंतर 23 मार्च रोजी सकाळी सभा सुरू करून दिवसभर चर्चा केली जाते आणि मग बजेट मंजूर केले जाते.’’
-आसिफ शेख, - माजी महापौर, मालेगाव

काय म्हणतात नगरसेवक..
सर्व बाबींचा सारासार विचार झाला पाहिजे. सभागृहात विषय सोडून चर्चा होते.’’ जगदेशी नवले
लवकर सभा बोलावली तर चर्चा करता येईल. सभा लवकर घेण्यासाठी महापौरांना बोलणार आहे.’’ संजीवनी कुलकर्णी
आम्ही नवीन आहे. बजेटवर चर्चा होणे अपेक्षित आहे. एका दिवसात चर्चा होत नाही.’’ विठ्ठल कोटा
चर्चा व्हावी. पक्षाने वेळ ठरवावी. बजेटचा निर्णय पदाधिकार्‍यांनी घ्यावा.’’ देवेंद्र कोठे
बजेट सभा लवकर घेणे चांगले. मी याबाबत महापौरांना बोलले आहे.’’ कुमूद अंकाराम
31 मार्च डेडलाईन आहे. दोन दिवस हवेत.’’ अविनाश बनसोडे
दोन दिवस सभा घेऊन वेळेत संपवा.’’ राश्रशी कणके (शिवसेना)
आम्ही नवीन असल्याने आम्हाला आणि लोकांनाही बजेट समजण्याच्या दृष्टीने पक्षाने निर्णय घ्यावा.’’ दमयंती भोसले
पाणीटंचाई आहे. त्यामुळे पाण्याचे बजेट आल्यावर त्यावर चर्चा करता येईल. लवकर व्हावे.’’ अविनाश पाटील (भाजप)
आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट झाली आहे. त्यामुळे 31 मार्चपूर्वी बजेट व्हावे.’’ कल्पना कारभारी (भाजप)
31 मार्चच्या आत सभा घेण्याची मागणी करणार्‍यांच्या पाठीशी मी आहे.’’ रवी गायकवाड (रिपाइं)
28 मार्चला बजेट घ्या. त्या दिवशी अर्धवट राहिले तर दुसर्‍या दिवशी घ्या.’’ सुनीता भोसले (बसप)
अ आणि ब नुसार चर्चा व्हावी. स्थायीमध्ये लवकर बजेट होण्यासाठी प्रयत्न करणार.’’ पद्माकर काळे (राष्ट्रवादी)