आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Building License Lost

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांधकाम परवान्यांच्या फायली झाल्या गहाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: शहरातील बहुतांश इमातींमधील पार्किंगच्या जागांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात असून, याबाबत कारवाईचा इशारा देणार्‍या महापालिकेच्या बांधकाम विभागाने महिन्यात फक्त एकाच इमारतीला नोटीस बजावली आहे. उर्वरित इमारतींना दिलेल्या बांधकाम परवान्यांच्या फायली शोधण्याचे काम सुरू आहे, अशी टोलवाटोलवी या विभागामार्फत केली जात आहे.
‘दिव्य मराठी’च्या ‘डीबी स्टार’मधून पार्किंगच्या जागांचा धंदा सुरू असल्याचा विषय मांडण्यात आला होता. त्यानंतर महिनाभरात कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते. शहरातील मध्यवर्ती परिसर असलेला सरस्वती चौक, लकी चौक, व्हीआयपी रस्ता आदी भागांतील व्यापारी संकुल, हॉटेल्स, लॉज, रुग्णालयांच्या इमारतींनी पार्किंगच्या जागांचा बहुतांश वापर व्यावसायिक कारणांसाठी केल्याचे उघड आहे. याची माहिती असूनही महापालिका बांधकाम विभागाकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.

महिन्यानंतर फक्त एक नोटीस बजावण्यात आली आहे. सरस्वती चौकातील प्रभात टॉकीजकडून लकी चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील कोपर्‍यात असलेल्या सिटी कॉर्नर इमारतीमधील गाळेधारकांना नोटिसा बजावल्याचे उपअभियंता दीपक भादुले यांनी सांगितले. गाळा नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आदींना नोटिसा बजावल्या आहेत. यात अण्णा इडलीगृहाचाही समावेश असल्याचे सांगितले. या गाळ्यांचा वापर स्टोअरसाठी करण्याची परवानगी असताना कर्मशियल वापर झाला आहे. ताज प्लाझा इमारतीचे पार्किंग पाठीमागे व दोन्ही साईडला दाखवण्यात आले, पण प्रत्यक्षात तेथे पार्किंग नसल्याने त्यांना यापूर्वीच नोटीस बजावली आहे. संगमेश्वर कॉलेजकडे जाणार्‍या मार्गावरील घर नंबर 163 मध्ये ज्यूस सेंटर काढल्याने त्यांनाही नोटीस बजावली आहे. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी शहरातील इमारतींची पाहणी करून यादी तयार केली आहे. पण संबंधितांना देण्यात आलेल्या बांधकाम परवान्यांच्या फायली सापडत नाहीत. त्या शोधण्याचे काम सुरू असल्याचे भादुले यांनी सांगितले.