आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Commissioner Gudewar Latest News In Marathi

कॉँग्रेस नगरसेवकांच्या दबावास कंटाळून सोलापूर मनपा आयुक्तांनी पद सोडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेत विकासकामे करताना सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना नेहमीच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यातच सोमवारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन केले. या दबावाच्या राजकारणामुळे त्रस्त झालेल्या गुडेवारांनी तातडीने बदलीसाठी प्रधान सचिवांकडे अर्ज करीत आयुक्तपदाचा पदभार सोडला.
गुडेवार यांनी पाच जुलै रोजी महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. कामाची गती वाढवतानाच त्यांनी काही नगरसेवकांवर कारवाई करण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांमध्ये त्यांच्याविरोधात मोठा रोष होता. मागील महिन्यापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे कारण पुढे करत या नगरसेवकांनी वेळोवेळी आयुक्तांना टार्गेट केले. सोमवारी त्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या दबावाच्या राजकारणाला वैतागलेल्या गुंडेवार यांनी विकासकामांत अडथळा आणल्यास आपल्याला काम करणे शक्य नसल्याचे सांगत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे बदलीसाठी अर्ज केला. तसेच तडकाफडकी पदभार सोडला. ते महापालिकेतून बाहेर पडताच काँग्रेसचे आंदोलनही थांबले.

कर्मचारी आक्रमक, आज ‘शहर बंद’ चे आवाहन
आयुक्तांनी पदभार सोडताच महापालिका कामगार संघटनेने त्यांच्या सर्मथनार्थ आंदोलन सुरू केले. काँग्रेस नगरसेवकांच्या विरोधात घोषणा देत त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. मनपाचे कर्मचारी सामूहिक राजीनामा देणार असल्याचे कामगार संघटनेचे नेते अशोक जानराव यांनी सांगितले. युतीच्या नगरसेवकांनीही पालिकेतील कार्यशाळा बंद पाडत ठिय्या आंदोलन केले, तर बसपनेही रास्ता रोको करत मोर्चा काढण्याचा इशारा दिला. काँग्रेसच्या नगरसेवकांचा निषेध करण्यासाठी व गुडेवारांच्या सर्मथनार्थ सर्वपक्षीयांच्या वतीने बुधवारी शहर बंदची हाक दिली आहे.

मी खुर्ची सोडली
आपलं शहर म्हणून मी काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. सध्याच्या परिस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत करणे शक्य नाही. दालनासमोर आंदोलन करत असताना खुर्ची रिकामी करा, अशा घोषणा दिल्या, त्यामुळे मी खुर्ची रिकामी केली. - चंद्रकांत गुडेवार, मनपा आयुक्त