आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Demolished 82 Building

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर महानगरपालिकेने केली 82 इमारती ज‍मीनदोस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेने होटगी रस्ता येथील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम सोमवारी सकाळी सात वाजता पुन्हा सुरू केली. मुलतानी बेकरी ते किलरेस्कर फेरस इंडस्ट्रीजपर्यंतच्या दुतर्फा रोडवरील अतिक्रमण महापालिकेने काढले. यात बहुतेक आरसीसी इमारतींचा समावेश होता. कोणाचा मूलाहिजा न ठेवता ही मोहीम राबवली. त्यात 82 इमारती पाडण्यात आल्या.

मोहीम अशीच सुरू राहील आणि विनापरवाना इमारती नियमित करता आल्या तर ते नागरिकांनी करून घ्याव्यात, त्यासाठी पाच आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पत्रकारांना दिली.

अतिक्रमणविरोधी मोहीम सोमवारी सकाळी सात वाजता पुन्हा सुरू करण्यात आली. उपअभियंता दीपक भादुले, आर. डी. गायकवाड, बी. बी. भोसले, नजीर शेख, वसंत पवार यांच्या पथकाने कारवाई केली.

दोन जेसीबींच्या साहाय्याने आसरा चौकातील मदिना हॉटेलसमोरील अतिक्रमण काढले. त्यानंतर कोळगिरी नगरातील खोके, पत्राशेड पाडले, मजरेवाडीसमोरील प्रभाकर चौगुले यांची इमारत पाडण्यात आली. या वेळी बघ्यांची गर्दी झाली होती. भारतमाता नगर येथील पवार फर्निचर, भोपळे बंधूंच्या किराणा दुकानसमोरील शेड, लक्ष्मी सांस्कृतिक मंगल कार्यालयासमोरचे शेड, पंडित बनसुरे यांचे प्रीतियोग सांस्कृतिक भवन, चौधरी ट्रान्सपोर्ट, माजी नगरसेवक आणि राजकीय पुढार्‍यांच्या इमारतीवर बुलडोझर फिरला. या वेळी इमारतीचे मालक उपस्थित होते. त्यांना बघ्याची भूमिका घेण्यापलीकडे काहीच करता आले नाही.

शनिवारी दुकानासमोरील शेड काढले होते. मात्र, सोमवारी बांधकाम पाडकाम मोठय़ा प्रमाणात करण्यात आले. त्यांना यापूर्वी नोटीस दिल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. होटगी रस्त्यावरील 100 मिळकतींवर शनिवारी बुलडोझर फिरवत मोहिमेस सुरुवात करण्यात आली.


सिंहगड’ पाडा : भाजप
पुणे रस्त्यावरील सिंहगड इन्स्टिट्यूटमधील 12 इमारतींचे बांधकाम बेकायदा आहे. त्यावर महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. त्यांचे हे 13 वे स्मरणपत्र आहे. यावर ‘सिंहगड’ची माहिती मागविली आहे. पण ती पाहिली नाही असे आयुक्त गुडेवार यांनी सांगितले.


कारवाई योग्य
आयुक्तांनी शहरातील अतिक्रमण पाडकामाची मोहीम घेऊन योग्य कारवाई केली. अशी कारवाई करणे गरजेचे होते. अशा कामांत आम्ही हस्तक्षेप करणार नाही.’’ अलका राठोड, महापौर


नियमित होत असेल तर..
अतिक्रमण काढणे सुरूच राहणार आहे. बांधकामे नियमित करता येत नाहीत, ती पाडण्यात येतील. विनापरवाना बांधकामासह नियमानुसार नियमित करता आली तर दंड आकारणी करून नियमित करणार आहे. त्यासाठी मिळकतदारांना पाच आठवड्यांची मुदत देण्यात येणार आहे. प्रत्येक झोन कार्यालयात बांधकाम परवाना विभागाच्या अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येत असून, तेथे कागदपत्रांची पडताळणी करून बांधकाम आणि वापर परवाने दिले जातील. मिळकतदारांनी आपली इमारत नियमित करून घ्यावी.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त महापालिका


आयुक्तांना आले 150 एसएमएस आणि 100 फोन
होटगी रोडवर कारवाई करताना आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना 150 एसएमएस आणि सुमारे 100 फोन आले. पण कोणीही कारवाईला विरोध केला नाही.

विनापरवाना इमारती नियमित करून देणार 0 पुढार्‍यांच्या नातेवाइकांच्या इमारती


इतके अतिक्रमण होईपर्यंत बांधकाम विभाग गप्प कसे?
तज्ज्ञ म्हणतात..
नागरिकही जबाबदार
महापालिकेने होटगी रस्त्यालगतच्या 190 जणांना नोटीस दिली. त्यापैकी बहुतेकांनी कारवाई कोण करेल म्हणून त्याकडे कानाडोळा केला. महापालिकेने व नागरिकांनी वेळीच दखल घेतली असती तर नुकसान टाळता आले असते.

महापालिकेला 25 कोटींचा कर
शहरात सुमारे 70 हजार मिळकती बेकायदा आहेत. हद्दवाढ भागात त्यांची संख्या जास्त आहे. कारवाई होऊ नये म्हणून मिळकतदारांनी इमारती नियमित करून घेतल्या तर पालिकेच्या तिजोरीत 25 कोटींची भर पडेल.


36 लाखांचे व्यवहार ठप्प
182 दुकानदारांचे सुमारे दोन दिवस व्यवहार ठप्प झाले. सरासरी दोन दिवसांचा 36 लाखांचा व्यवहार ठप्प झाला.


विमा मिळणार नाही
दुकनावरील विम्याचा लाभ मिळवण्यासाठी गुन्हा दाखल होणे अपेक्षित असते. अशा कारवाईनंतर विम्याचा लाभ मिळू शकत नाही, असे विमा प्रतिनिधी लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.


इन्कमटॅक्समध्ये लाभ
उत्पन्नावर परिणाम करणारा हा प्रकार असल्याने या वर्षाच्या उत्पन्नात हे नुकसान दाखवता येते. त्यामुळे त्यांचा लाभ दुकानदारांना मिळेल, असे सनदी लेखापाल श्रीनिवास वैद्य यांनी सांगितले.