आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Drainage Contract Issue

ड्रेनेज मक्त्यावरून राजकीय संघर्ष सुरू, आयुक्तांच्या सर्मथनासाठी संघटना, राजकीय पक्ष सरसावले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ड्रेनेज कामाचा मक्ता रद्द केल्यानंतर शहरात राजकीय संघर्ष वेगाने पेट घेत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या 212 कोटी रुपयांच्या ड्रेनेज कामाचा मक्ता आयुक्त गुडेवार यांनी मंगळवारी रद्द केला.
मक्ता रद्द करण्यापूर्वी आयुक्तांनी विषय स्थायी समिती आणि सभागृहापुढे ठेवणे आवश्यक होते, असे मत सभागृह नेते महेश कोठे यांनी गुरुवारी पुन्हा व्यक्त केले. तर, मक्ता देण्यासाठी सत्ताधार्‍यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेनेने केला. आयुक्तांची बदली करण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलन करण्याचा इशारा विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी दिला. दरम्यान, मक्तेदाराने गुरुवारी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावर 23 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
सत्ताधारी नगरसेवकाने केला होता भ्रष्टाचाराचा आरोप
योजनेत 50 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केला होता. 52 टक्के जादा दराने मक्ता दिल्याने विरोधी पक्षाने सुरवातीच्या काळात आक्षेप घेतला होता. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला टेंडर देण्यासाठी एक कोटीच्या लाचेचा प्रयत्न झाल्याचा आरोप नगरसेवक सुरेश पाटील यांनी केला होता.
ड्रेनेज मक्ता देताना 25 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी गुरुवारी केला. या वेळी शहर प्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक शैलेंद्र आमणगी आदी उपस्थित होते. आयुक्तांच्या बदलीचा घाट घातला जात असल्याने पदाधिकार्‍यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची तयारी बसपाने केली आहे. नगरसेविका सुनीता भोसले, उषा शिंदे उपस्थित होते.
आयुक्तांची बदली झाल्यास मनपा कर्मचारी रस्त्यावर उतरतील, अशी माहिती कर्मचारी संघटनेचे अशोक जानराव यांनी दिली. मक्ता रद्द प्रकरणी पाठिंबा असल्याचे भाजपतर्फे आयुक्तांची भेट घेऊन सांगण्यात आले. या वेळी विरोधी पक्षनेते कृष्णहरी दुस्सा, जगदीश पाटील, रोहिणी तडवळकर, नरेंद्र काळे, शिवानंद पाटील, अमर पुदाले उपस्थित होते. माकपचे केंद्रीय सदस्य नरसय्या आडम यांनी आयुक्तांच्या सर्मथनासाठी 20 हजार विडी कामगारांचा मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
केंद्राकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न
ड्रेनेज कामाचे पुन्हा टेंडर काढण्यात येईल. याशिवाय सुधारित आराखडा तयार करून शहर विकास आराखड्यात घालण्यात येईल. त्यामुळे केंद्राकडून सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी मिळेल आणि त्यातून शहराचा विकास होईल. मक्ता रद्द झाल्याने महापालिकेचे 118 कोटी रुपये वाचतील, त्या पैशाचा वापर इतर विकास कामांसाठी करता येईल.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका
झालेल्या कामांचे प्रमाण व कंसात अपेक्षित काम
नेहरू नगर परिसर 60 (81)
मजरेवाडी, कुमठे परिसर 36 (81)
हद्दवाढ भागात ड्रेनेज लाइन सुधारणे 00 (70)
जुन्या गावठाणमध्ये ड्रेनेज लाइन 7 (70)
देगाव मलनिस्सारण केंद्र 52 (85)
पाइप पुरवठा 53 (78)
38.69 कोटींची कामे (अपेक्षित 126.48 कोटी रुपये)
पुढे काय?
काँग्रेस पक्षामध्ये दोन गटांतील वाद आणखी वाढेल
सभागृह नेते कोठे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते