आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- आयुक्तांनी केलेल्या कथित अपमानाच्या मुद्दय़ावरून भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी सोमवारी आंदोलन केले. माफीच्या मागणीवर आयुक्त अजय सावरीकर यांच्या कक्षात दोन तास ठाण मांडून होते. र्शी. सावरीकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलन संपले. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मनोहर सपाटे यांना शिष्टाई करावी लागली.
ड्रेनेज लाइन सफाईकामासाठी 79 लाखांची तरतूद होती. चालू दरसूचीनुसार ते एक कोटी 11 लाखांचे काम करण्याचा प्रशासनाने पाठविलेला प्रस्ताव स्थायी समितीने बहुमताने मंजूर केला. महापालिकेचे यात 33 लाख रुपयांचे नुकसान होत असल्याच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर यांनी शनिवारी र्शी. सावरीकर यांना फोन केला. ‘काम नियमानुसार केले आहे. त्यामुळे आता मी येत नाही. काय करायचे हे ते करा’ असे वक्तव्य र्शी. सावरीकर यांनी केले. हा लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याची भूमिका युतीने घेतली. याच्या विरोधात सायंकाळी 5.15 वाजता आयुक्तांच्या कक्षात ठिय्या मारत ‘चले जाव, चले जाव’, ‘बेकायदेशीर काम करणार्या आयुक्तांचा धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या. ठाण मांडून बसलेल्या नगरसेवकांनी आयुक्तांना कक्षात प्रवेश करू दिला नाही. त्याची घोषणाबाजी सुरूच होती. त्यामुळे र्शी. सावरीकर पत्रकार परिषदेसाठी मिटींग हॉलमध्ये परतले.
.. आणि वातावरण तापले
तुम्ही आमचे नोकर आहात, असे नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले असता, ‘मी तुमचा नोकर नाही’ असे र्शी. सावरीकर म्हणाले. त्यावेळी नगरसेवक चवताळले. झाले. ‘आम्ही जनतेचे सेवक आहोत पण तुम्ही आमचे नोकर आहात’ असे नगरसेवक म्हणाले.
बेकायदेशीर कामांचा पाढा
शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर काम केले जात आहे, असे म्हणत नगरसेवक सुरेश पाटील यांनी पाढा वाचला. जुळे सोलापूर पाण्याच्या टाकीजवळ बेकायदेशीर टाक्या बांधल्या. ते पाडण्याचे आदेश असताना पाडले जात नाही, मेजर शॉपिंग सेंटरची भाडेवाढ केली जात नाही, बेकायदेशीर जागा वाटप केले जाते, पार्किंगच्या जागेत अतिक्रमण होत असताना दुर्लक्ष केले जाते आदी प्रकारच्या तक्रारी पाटील यांनी केल्या.
प्रशासन सुरळीत चालावे म्हणून दिलगिरी
काम नियमानुसार केले आहे. शनिवारी उपायुक्त अनिल विपत यांना कोंडले, ते योग्य नाही. नियमबाह्य काम केले तर तक्रार केली पाहिजे. लोकशाहीत त्याची एक पद्धत आहे. शेवटी महापालिका प्रशासन सुरळीत चालावे म्हणून मी लोकप्रतिनिधीकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.’’ अजय सावरीकर, महापालिका आयुक्त हे होते आंदोलनात
विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर, नगरसेवक नरेंद्र काळे, अमर पुदाले, प्रा. अशोक निंबर्गी, सुरेश पाटील, मोहिनी पत्की, इंदिरा कुडक्याल, रंजना आंबेवाले, जयर्शी गदवालकर, मंगला पाताळे, मेनका चव्हाण, अविनाश पाटील, नागेश वल्याळ, निर्मला बल्ला, पांडुरंग दिड्डी, शैलेंद्र आमणगी, अनंत जाधव, जगदीश पाटील, शशी थोरात, मल्लिनाथ याळगी, डॉ. गाजूल, प्रताप चव्हाण आदी.
पहिल्यांदाच दिलगिरी
आतापर्यंत महापालिकेत आयुक्तांविरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष अनेकवेळा उभा ठाकला. काही वेळा तर तो सभागृह विरुद्ध आयुक्त असाही होता. तर काही आयुक्तांच्या विरोधात आंदोलनेही झाली. त्याची तिव्रता कमी-अधिक होती. मात्र, अपवाद वगळता बहुतांश प्रसंगी सामोपचारानेच तिढा सोडविण्यात आला. मात्र, प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.