आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन अधिभार: सोलापूरकरांची लूट अशीच राहणार सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रस्त्याच्या कामासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड झाल्यानंतरही सोलापूरच्या नागरिकांकडून महापालिका इंधन अधिभार वसूल करत आहे. अशा पद्धतीने वसुली करावयाची असल्यास त्याचे कारण देऊन तसा प्रस्ताव मनपाच्या सभेकडून मंजूर करून घणे गरजेचे असते. मात्र, महापालिका अधिकारी आणि पदाधिकारी याबाबत बोलण्यासाठीही टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे सोलापूरकरांची लूट सुरूच राहणार आहे.

शहरातील अंतर्गत रस्ते तयार करण्यासाठी मनपाने महाराष्ट्र बँकेकडून घेतलेल्या 10.87 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी इंधनावर अधिभार लावण्यात आला होता. कर्जाची परतफेड झाली तरी अधिभाराची वसुली सुरूच आहे.

महापौर अलका राठोड, सभागृह नेते महेश कोठे, साहाय्यक आयुक्त पी. वाय. बिराजदार यांना विचारले असता, माहिती घेऊ, असे सांगून त्यांनी टाळाटाळ केली. सोलापूरकरांची लूट सुरू असताना विरोधक मात्र शांतच आहेत. 2006 मध्ये घेतलेल्या या कर्जाची परतफेड सप्टेंबर 2011 मध्ये झाली. त्यानंतर इंधन अधिभाराची वसुली बंद होणे अपेक्षित होते. मात्र सेसचे 1.27 कोटी रुपये बाकी असल्याने महापालिका प्रशासनाने वसुली सुरूच ठेवली. डिसेंबर 2012 अखेर त्या 1.27 कोटी रुपयांचीही वसुली झाली, असे मनपाकडे असलेल्या नोंदींवरून स्पष्ट होते. पुढे वसुली चालू ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सभागृहाकडे प्रस्ताव ठेवणे अपेक्षित होते, वसुलीसाठीचे कारणही देणे अपेक्षित होते. मात्र अद्याप तसे झालेले नाही. कर्जाची रक्कम तर वसूल झाली, शिवाय अधिभार सुरूच असल्याने अतिरिक्त आठ लाख रुपयेही मनपाने वसूल केले. आता यापुढेही ही वसुली सुरूच राहणार आहे. ती एवढय़ात तरी थांबण्याची चिन्हे नाहीत.

अहवाल पाहून माहिती देतो
सेसच्या संदर्भात अहवाल महापौरांना पाठवण्यात आला आहे. तो पाहिल्यानंतर निश्चित आकडा समजेल. आम्ही इंधन कंपन्याना अहवाल दिल्यानंतर त्यांच्याकडून सेस लावणे आणि काढणे याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतरच माहिती देता येईल.’’
- पी. वाय. बिराजदार, उपायुक्त (महसूल), मनपा

आयुक्त आल्यानंतर चर्चा करू
महाराष्ट्र बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड झाली असली तरी कर्जाची पूर्ण रक्कम त्यावेळी उचलली नाही. ती नंतर उचलण्यात आली. त्याची वसुली सुरू असेल. या संदर्भात सविस्तर माहिती आयुक्त अजय सावरीकर हे विशाखापट्टणम येथून परत आल्यानंतर घेण्यात येईल.’’
-महेश कोठे, सभागृह नेते, मनपा

सभेपुढे प्रस्ताव ठेवणार
सेस कर्जाची परतफेड झाली असताना नागरिकांकडून इंधन अधिभाराची वसुली सुरूच आहे. सेसची माहिती मनपा प्रशासनाकडून सभागृहात मागवण्यात येणार आहे. यासाठी मी फेब्रुवारीच्या सभेत प्रस्ताव देऊन माहिती मागवणार आहे.’’
-रोहिणी तडवळकर, विरोधी पक्षनेत्या, मनपा

अशी होतो अधिभार वसुली
पेट्रोल : 78 पैसे प्रतिलिटर
डिझेल : 65 पैसे प्रतिलिटर