आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर: सभागृहाने घेतला धसका; अडीच तासांत 21 विषय मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गुरुवारी महापालिका सभागृहाने आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यपद्धतीचा धसका घेतल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर ज्यांच्या विरोधात त्यांनी कारवाई केली ते नगरसेवकही त्यांच्या अभिनंदनासाठी पुढे सरसावल्याचे चित्र होते. र्शद्धांजलीचे निमित्त करून सभा तहकूब करण्याची परंपरा खंडित झाली. 90 हून अधिक दिवस मागे राहिलेले विषय आयुक्तांनी निर्णयासाठी स्वत:च्या अधिकारात घेतल्याने जून आणि ऑगस्ट महिन्यातील तहकूब सभेचे सर्वच विषय एकाच टप्प्यात मंजूर करण्यात आले.

महापौर अलका राठोड सभेसाठी आग्रही असल्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे नगरसेवकांनी स्वागत केले. अडीच तासांच्या सभेत 21 विषयांना मंजुरी देण्यात आली. 210 सिटी बस घेण्याच्या 62 कोटींच्या योजनेसाठी आराखडा तयार करण्यास सभागृहाने मंजुरी दिली. चाळीतील बांधकामास 2.5 एफएसआय देण्याच्या विषयाला मंजुरी मिळाली. गुडेवारांच्या उपस्थितीत प्रथमच कामकाज झाले.

अर्धा तासाने सभा सुरू करण्याचा नवा पायंडा : कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यावर सभा अर्धा तासासाठी तहकूब करून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी महापौर अलका राठोड यांनी गुरुवारी केली. माजी महापौर बंडप्पा मुनाळे, नरेंद्र दाभोळकर यांच्यासह इतरांना श्रध्दाजंली अर्पण करून पुन्हा अर्धा तासाने सभा सुरू करण्यात आली. मुनाळे यांच्या आठवणींना आणि कार्यपद्धतीला उजाळा देण्यात आला.

62 कोटींच्या परिवहन आराखड्यास मंजुरी

मार्चपर्यंत धावतील 210 सिटी बस
परिवहनसाठी 62 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली.

यात 210 सिटी बस असून, त्यात 15 एसी बस असतील. याशिवाय 150 मोठे बस, 35 मिनी असतील. अत्याधुनिक सिटी बस डेपो आणि बस स्थानक असेल.

तीन आठवड्यांत हा आराखडा तयार करण्याचा विक्रम सोलापुरात झाला. तो राज्याकडे असून, पुढील महिन्यात केंद्राकडे जाईल. मार्चअखेर सोलापुरात नवीन सिटी बस धावतील.

संभाजी तलाव सुशोभीकरणासह अनेक कामे मंजूर
संभाजी तलाव सुशोभीकरण, 13 व्या वित्त आयोगातून 10 कोटींची पाइपलाइन, गरजूंना मदत, विविध मार्गांचे नामकरण, उद्योगपतींसाठी बांधकाम परवाना, अग्निशामक सेवा बळकटीकरण, नेहरू नगर ते नवीन आरटीओपर्यंत पाइपलाइन आदी विषयांना अडीच तासांत मंजुरी देण्यात आली. सभागृहात चुकीच्या पध्दतीने पाइपलाइन टाकण्याच विषय आल्याने तो प्रशासनाने परत घेतला.

अभिनंदानात बाके वाजली
आयुक्तांच्या 60 दिवसांच्या कार्यशैलाला नगरसेवक मनोहर सपाटे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सलाम केला. जनतेने आयुक्तांना डोक्यावर घेतले. त्यामुळे आमची गुरूकिल्ली आयुक्तांच्या हातात आली. आम्ही विरोध केला तर जनता आम्हाला डिसमिस करेल, अशी भीती सपाटे यांनी व्यक्त केली. उदय चाकोते, अनिल पल्ली, नागेश वल्याळ, प्रवीण डोंगरे, जगदीश पाटील, विरोधी पक्षनेता कृष्णाहरी दुस्सा, रोहिणी तडवळकर आदींनी गुडेवारांच्या कामाचे कौतुक करत अभिनंदन केले.

पाइपलाइनसाठी 10 कोटी रुपयांना मान्यता
पाइपलाइन, रस्त्याची कामे यासाठी जूनमध्ये सभागृहाने 1.73 कोटी कामास मंजुरी दिली. तो विषय 90 दिवसांच्या आत पुन्हा आल्याने बेकायदा असल्याचे अनिल पल्ली यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे तो विषय आयुक्तांनी परत घेतला.