आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापती कुरेशी उशीरा आल्‍याने, पाटील बनले सभापती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी बोलावण्यात आली होती. पण, सभापती इब्राहिम कुरेशी वेळेवर न आल्याने संतापलेल्या विरोधी पक्षाने नगरसेवक शिवानंद पाटील यांना हंगामी सभापती म्हणून घोषित करून सभा सुरू केली. दरम्यान सभापतींचे आगमन झाले. त्यांनी पाटील यांना सभापतीच्या खुर्चीवरून उठण्यास सांगितले. त्यांनी नकार दिल्याने एकच गोंधळ उडाला. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू होता.

महापालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता बोलावण्यात आली होती. पण, सभा वेळेवर सुरू होत नसल्याचे पाहून संतापलेल्या विरोधी पक्षाने सायंकाळी 4.48 वाजता भाजपचे हंगामी सभापती म्हणून नगरसेवक शिवानंद पाटील यांची नियुक्ती करून नगरसचिवांच्या अनुपस्थितीत सभा सुरू करण्यात आली. त्यानंतर दहा मिनिटांनी विद्यमान सभापती इब्राहिम कुरेशी यांचे आगमन झाले. परंतु, सभापतीच्या खुर्चीवर बसलेल्या पाटील यांनी उठण्यास नकार दिल्याने एकच गोंधळ उडाला. सहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या मध्यस्थीनंतर हा प्रकार थांबला. या सर्व प्रकारामुळे चिडलेल्या कुरेशी यांनी काही मिनिटाच सभा तहकूब करून काढता पाय घेतला.

नगरसचिव मांजर
सभेची वेळ असताना नगरसचिव सभागृहात आले नाही. ते स्थायी समिती सभापतीच्या कक्षात बंदिस्त होते. ते नगरसचिव आहे की, विरोधकांचे मांजर. चमचेगिरी करणार्‍या आणि वेळेत न येणार्‍या प्र. नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करीत विरोधकांनी गोंधळ घातला.

असा झाला कारभार
हंगामी सभापती म्हणून प्रस्ताव न करता, तेथील कर्मचार्‍यांना लेखी पत्र देऊन शिवानंद पाटील यांना सभापतीच्या आसनावर बसवण्यात आले. त्यासाठी सुरेश पाटील यांनी सूचना तर आनंद चंदनशिवे यांनी अनुमोदन दिले. सभेतील हा प्रकार झाल्यानंतर सभापती कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सभा सुरू झाली. पण त्यांनी पाच मिनिटातच सभा तहकूब केली.

स्थायी सभेला उशीर; विरोधकांची प्रतिकात्मक सभा
शहर विकासाऐवजी महापालिकेत नगरसेवकांनी पोरखेळ सुरू केला आहे. मागील काही घटनेत महापालिकेत सुरू असलेल्या कारभाराचे दर्शन जनतेला होत आहे. विकास कामात अग्रेसर असलेल्या आयुक्तांना अडसर आणत नगरसेवक चेतन नरोटे, दिलीप कोल्हे यांनी दमदाटी केली. चार दिवसांपूर्वी निराळेवस्ती येथील कामावरून नगरसेवक महेश कोठे आणि मनोहर सपाटे यांचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर आज स्थायीच्या बैठकीत भाजपने घातलेला गोंधळ आणि सभापती कुरेशी यांनी केलेली आदळ आपट केली. यावरून महापालिकेत सुरू असलेल्या कारभाराची वस्तुस्थिती समोर येत आहे.

निवडीला नाही आधार
भाजपचे पाटील यांची हंगामी सभापतिपदी निवड केली, असा दावा विरोधकांचा असला तरी ती निवड कायदेशीर नसल्याचे स्पष्ट होते. नगरसचिव सभागृहात नसताना हंगामी सभापती निवड करता येत नाही. त्यामुळे यास महत्त्व नाही, असे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कायदेशीर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न
आम्ही कायदेशीर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. नगरसचिव वेळेवर सभागृहात आले नाहीत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. सभापती कुरेशी यांना कामाचे भान नाही. सुरेश
पाटील, नगरसेवक

सभापतीचा अपमान
सभापती आसनाजवळ आले असताना त्यांची खुर्ची दिली नाही. विरोधकांनी त्यांचा अपमान केला. 15 मिनीट उशीर झाला. उदय चाकोते, नगरसेवक